नागरिकांच्या सहकार्यामुळेच कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणू शकलो – अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/0T7A7325.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करून केलेले सहकार्य आणि एकजुटीने केलेल्या मुकाबल्यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणू शकलो, असे मत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला pqrtvun परतवून लावण्यासाठी असेच सहकार्य सर्वांनी कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दापोडी येथील आनंदवन कुष्ठरोग वसाहतीमध्ये आज कुष्ठरोग बाधितांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी या बाधितांसमवेत संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास नगरसदस्या स्वाती उर्फ माई काटे, नगरसदस्य राजू बनसोडे, स्वीकृत सदस्य अनिकेत काटे, माजी नगरसदस्य राजेंद्र काटे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग नागरी पर्यवेक्षकीय पथकाचे वैद्यकीय सहाय्यक नागेश कोष्टी, अवैद्यकीय सहाय्यक श्रीलेखा बिजरे, आनंदवनचे सरपंच नवनाथ मगर, सामाजिक कार्यकर्ते सुरेखा दोडमणी, निलेश दोडमणी, विक्रम मानेकर, अनिल कांबळे, सचिन कोष्टी, लक्ष्मी कापसे आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, कुष्ठरोग बाधितांच्या वसाहतीमध्ये कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र आज कार्यान्वित करून येथील बाधित घटकांचे लसीकरण करण्याचे काम महापालिकेने केले आहे. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महापालिकेच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी बळ कमी पडते असे वाटत असताना लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे आणि सहकार्यामुळे आपण कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण रोखू शकलो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकजण योगदान देत आहेत. असेच सहकार्य कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेला रोखण्यासाठी आवश्यक आहे. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी नियोजन केले जात असून सर्वांची साथ यासाठी आवश्यक आहे. कुष्ठरोग बाधितांना आवश्यक सर्व मदत करण्यास महापालिका पुढाकार घेऊन सेवेसाठी सदैव तत्पर असेल असे ढाकणे म्हणाले.
राजेंद्र काटे म्हणाले, कुष्ठरोग बाधितांना मदतीची गरज असून त्यांच्याकडे समाजाने सहानुभूतीने पाहावे आणि त्यांना आधार द्यावा.
नगरसदस्या माई काटे म्हणाल्या, आनंदवन वसाहतीत राहणा-या कुष्ठरोग बाधितांची एकजूट आणि शिस्त वाखाणण्याजोगी आहे. प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत असताना त्यावर मात करून आनंदी जीवन जगण्यासाठी कुष्ठरोग बाधितांनी केलेला प्रवास आदर्शवत आहे. त्यांच्या संघर्षाला समाजाने माणुसकीची झालर देणे गरजेचे आहे.