breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘इंद्रायणीनगर येथील उखडलेल्या ‘सिंथेटिक ट्रॅक’ च्या निकृष्ट कामाची चौकशी करा’; अजित गव्हाणे

भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भ्रष्टाचारी कारभाराची अनेक उत्तम उदाहरणे समोर येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या उभारणीपूर्वीच मूर्तीच्या ‘मोजडी’ला तडे गेल्याचे नुकतेच महाविकास आघाडीने उघडकीस आणल्यानंतर, आता इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील वर्षभरापूर्वी बसविलेला ‘सिंथेटिक ट्रॅक’ (इपीडीएम पियूस्प्रे ट्रॅक) उखडून त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असल्याचे समोर आले आहे. या नवीन ट्रॅकसाठी वर्षभरापूर्वी चार कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. मात्र हा संपूर्ण खर्च पाण्यात गेले असल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील अॅथलेटिक्स खेळाचा सराव करणाऱ्या खेळाडूंना सरावासाठी शहरातील एकमेव सिंथेटिक मैदान इंद्रायणी नगर येथे आहे. या ठिकाणी ४०० मीटरचा, आठ लेनचा सिंथेटिक ट्रॅक आहे. दहा वर्षांपूर्वी हा ट्रॅक तयार करण्यात आला होता. अनेक वर्षांपासून ट्रॅकवर खेळाडूंचा नियमित सराव आणि विविध स्पर्धांमुळे तसेच बाहेरील वातावरणामुळे जुना ट्रॅक खराब झाला होता.  2023 मध्ये जुना सिंथेटिक ट्रॅक बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. नव्या ट्रॅकसाठी सुमारे चार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. नोव्हेंबर मध्ये ट्रॅक खेळाडूंसाठी खुला करण्यात आला. दोन महिन्यातच पुन्हा हा ट्रॅक दुरुस्तीच्या नावाखाली बंद करण्यात आला..15 मार्च 2024 रोजी हा ट्रॅक पुन्हा सरावासाठी खुला करण्यात आला. मात्र त्यानंतर चार ते पाच दिवसातच हा ट्रॅक उखडल्याचे दिसून आले. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांसाठी हा ट्रॅक बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली. पुन्हा ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आली.त्याचवेळी येथील प्रशिक्षकांनी दावा केला होता की हा ट्रॅक वर्षभर सुद्धा टिकणार नाही. कारण या ट्रॅकची बांधणी करताना पूर्णतः बेजबाबदारपणा करण्यात आला होता. नुकतीच या ट्रॅकवर पोलीस भरतीच्या उमेदवारांची चाचणी घेण्यात आली.

त्यानंतर आता या ट्रॅकची पूर्णतः दुर्दशा झालेली आहे. अनेक क्रीडाप्रेमी येथे आल्यानंतर त्यांचा हिरमोड होत आहे. कोणत्याही सरावाविना त्यांना घरी परतावे लागत आहे.

हेही वाचा –  ‘खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

या क्रीडा संकुलनातील सिंथेटिक ट्रॅकवर दररोज 300 ते 400 ॲथलेटिक सराव करण्यासाठी येतात. वारंवार या ट्रॅकची दुरुस्ती करावी लागत आहे. आम्ही केलेला सिंथेटिक ट्रॅक तब्बल दहा वर्ष टिकला. बदललेल्या ट्रॅकवर कोट्यावधींचा खर्च करून सहा महिने सुद्धा हा ट्रॅक खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेविषयी प्रचंड शंका उपस्थित होत आहे. भाजपच्या सत्ता काळात करण्यात आलेला चार कोटी खर्च क्रीडा संकुलनाची लौकिक कमी करण्यासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी होता का असा संताप अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड पालिकेच्या क्रीडा विभागाचा भोसरी विधानसभेच्या आमदारांच्या दबावाखाली अक्षरशः आंधळा कारभार सुरू आहे. ॲथलेटिकबद्दल कोणतीही माहिती नसलेले निर्णय घेतात. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र अॅथलेटिक्स टेक्निकल कमिटीकडून चार महिन्यांपूर्वी या ट्रॅकची पाहणी केली गेली. महाराष्ट्रातील सर्वात निकृष्ट दर्जाचा हा ट्रॅक आहे अशी कमिटीची प्रतिक्रिया होती.यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड नाराजी आहे. ठराविक लोकांच्या मक्तेदारीसाठी या मैदानाचे स्टॅंडर्ड पालिकेने राखले नसल्याच्या प्रतिक्रिया येथील प्रशिक्षकांनी दिल्या.

शहरातील ॲथलेटिक खेळाडूंना पूर्वी सरावासाठी बालेवाडी येथे जावे लागत होते. त्यामुळे आम्ही पाठपुरावा करून इंद्रायणीनगर संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक करून घेतला. ट्रॅकच्या कॉलिटीकडे अत्यंत गंभीर दुर्लक्ष झालेले आहेत. खेळाडूंच्या गरजा काय आहेत हे लक्षात न घेता येथे काम करण्यात आलेले आहे. येथे  येणाऱ्या खेळाडूंना क्रीडा साहित्य देखील वेळेवर मिळत नसल्याची इथली परिस्थिती आहे. आम्ही जे प्रकल्प उभारले त्या प्रकल्पांची योग्य काळजी देखील भाजप पदाधिकाऱ्यांना घेता आलेली नाही. खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता असल्यामुळे या ट्रॅकवरील सराव तात्काळ थांबविण्याची गरज आहे. प्रशासनाने तातडीने ट्रॅकची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

– संजय वाबळे, माजी नगरसेवक, इंद्रायणी नगर.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button