कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; जम्बो रुग्णालय 15 जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार!
![Increase in coronary artery disease; Jumbo Hospital to reopen from January 15!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/jpg-e1641535549865.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय 15 जानेवारीपासून पुन्हा 800 बेडसह सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये 600 बेड ऑक्सिजनयुक्त, 200 आयसीयू बेड उपलब्ध राहणार आहेत. त्यावर दोन महिने कालावधीसाठी 10 कोटी 14 लाख रुपये खर्च होणार आहे.कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जुलै 2020 मध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलात जम्बो रुग्णाल रुग्णालय उभारण्यात आले. पहिल्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने हे जम्बो रुग्णालय 16 जानेवारी 2021 पासून बंद करण्यात आले होते.
फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गामुळे रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर 15 सप्टेंबर 2021 पासून जम्बो रुग्णालय बंद करण्यात आले होते.
आता शहरात पुन्हा कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी 4 जानेवारी 2022 रोजी बैठक घेतली. या बैठकीत जम्बो रुग्णालय 15 जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णालयात बेडची संख्या 800 एवढीच ठेवण्यात येणार आहे. त्यामध्ये 600 बेड ऑक्सिजनयुक्त आणि 200 बेड आयसीयू असणार आहेत.
यासाठी पीएमआरडीएने पूर्वी प्रसिद्ध केलेल्या निविदेतील लघुत्तम निविदाधारक मेडब्रोज हेल्थकेअर डायग्नोस्टिक सेंटर यांच्याकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाणार आहे. 15 जानेवारी ते 14 मार्च 2022 या दोन महिने कालावधीकरिता दोन्ही प्रकारच्या बेडसाठी एकूण 10 कोटी 14 लाख रुपये खर्च होणार आहे. बेडचे प्रतिदिनानुसार ऑक्सिजनयुक्त बेडचा प्रतिदिन 1 हजार 404 रुपये आणि आयसीयू बेडचा 4 हजार 385 रुपये प्रतिबेड प्रतिदिन दर असणार आहे.