पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरात वाढ
![पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरात वाढ, मध्यरात्रीपासून नवीन दर लागू](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/पुणे-व-पिंपरी-चिंचवडमधील-सीएनजीच्या-दरात-वाढ-मध्यरात्रीपासून-नवीन-दर.jpeg)
पुणे | पुणे व पिंपरी चिंचवडमधील सीएनजीच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना बुधवारी (दि.८) मध्यरात्रीनंतर एक किलो सीएनजीसाठी ८२ रुपये मोजावे लागणार आहेत. मागील काही महिन्यात सीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. सीएनजी गॅसची सतत मागणी वाढत आहे, मात्र स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग झाल्याने सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पुण्यामध्ये एप्रिलमध्ये सीएनजीचा दर ६२.२० रुपये होता. त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तीन वेळा दर वाढ करण्यात आली होती.
पुण्यात २८ एप्रिल रोजी मध्यरात्री सीएनजीचा दर ७७.२० रुपये झाला. त्यानंतर २० मे च्या मध्यरात्री यामध्ये दोन रुपयांची पुन्हा वाढ करण्यात आली. आता पुन्हा बुधवारी (दि.८) मध्यरात्रीपासून दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी मध्यरात्रीपासून पुण्यातील वाहन चालकांना सीएनजीसाठी ८२ रुपये मोजावे लागणार आहेत. एमएनजीएलकडून पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागात सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो. एमएनजीएल चे पुणे परिसरात १०८ सीएनजी पंप आहेत. मुंबई महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो.