पिंपरी, सांगवी, तळेगाव दाभाडे येथे विनयभंगाच्या घटना
![Incidents of molestation at Pimpri, Sangvi, Talegaon Dabhade](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/molestation-2.jpg)
तळेगाव | पिंपरी, सांगवी आणि तळेगाव दाभाडे परिसरात विनयभंगाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी गुरुवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विनयभंगाची पहिली घटना नेहरुनगर, पिंपरी येथे बुधवारी (दि. 8) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. सात वर्षीय मुलगी तिच्या आजीच्या घरी चालत जात असताना एका अल्पवयीन मुलाने तिला सोसायटीच्या पार्किंगमध्ये अडवले. तिथे मुलीसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीच्या आईने अल्पवयीन मुलाच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
विनयभंगाची दुसरी घटना सांगवी परिसरात मागील तीन महिन्यांपासून 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत घडली. संतोष भोपळे (वय अंदाजे 42, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने एका महिलेचा वारंवार पाठलाग करून, तिच्यासमोर गैरवर्तन करून महिलेचा विनयभंग केला. तसेच महिला पिंपळे गुरव येथून रस्त्याने जात असताना तिचा पाठलाग करून, ‘कुठे चालली गं, अशी मिरवत. कुठे चालली तू, असे कपडे घालून. गेल्या वेळचा मार तुला कमी नाही झाला. परत तुझे तोंड फोडावे लागणार आहे वाटते. तुला तोंड दाखवण्यासारखे मी ठेवणार नाही. यावेळी तर मी तुला जिवंत सोडणार नाही’. अशी धमकी देखील दिली. याबाबत पीडित महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
विनयभंगाची तिसरी घटना 6 ऑगस्ट 2021 रोजी तळेगाव दाभाडे येथे घडली. मनोहर कुमार (रा. तळेगाव दाभाडे) यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनोहर कुमार याने एका महिलेशी गैरवर्तन करत तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.