Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-PCMC: ‘मेरीट सर्व्हे’ मध्ये निष्क्रीय दिग्गजांचा ‘‘पत्ता कट’’

भाजपाची मोठी रणनिती : अनेक मातब्बर इच्छुकांच्या मनात धास्ती?

पिंपरी-चिंचवड | विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांचे वातावरण तापत असताना भाजपामध्ये उमेदवारीसाठी ‘‘मेरिट सर्व्हे’’ने मोठी खळबळ उडवून दिली आहे. पक्षाच्या गोपनीय सर्व्हेमध्ये अनेक माजी नगरसेवक आणि निष्क्रीय समजल्या जाणाऱ्या दिग्गजांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने निवडणूक प्रभाग रचना ठरण्यापूर्वी एक सर्व्हे केले, प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर दुसरा सर्व्हे पूर्ण केला आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर तिसरा सर्व्हे करून अहवाल थेट पक्षश्रेष्ठींना पाठवला आहे. विश्वासनीय सूत्रांच्या दाव्यानुसार, “मेरिट निकषांवर आधारित तिकीटवाटपामुळे काही दिग्गजांचा ‘पत्ता कट’ निश्चित आहे.”

भाजपामध्ये ‘जुने विरुद्ध नवे’ हा संघर्ष कायम असून, नव्याने प्रवेश केलेले इच्छुक उमेदवार तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच वेळी, माजी नगरसेवक आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरुन असंतोष वाढले आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी “उमेदवारी मेरिटवरच” अशी घोषणा केली आहे, ज्यामुळे काही माजी नगरसेवकांवर टांगती तलवार आहे.

हेही वाचा    :      पुन:श्च विश्वविक्रमाच्या दिशेने वाटचाल: ‘रिव्हर सायक्लोथॉन’साठी २५ हजार सायकलपटूंची नोंदणी पूर्ण! 

विशेष म्हणजे, भाजपाच्या प्रदेश पातळीवरुन हा सर्व्हे करण्यात आला आहे. परिणामी, स्थानिक आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखे यांना आपआपल्या समर्थक इच्छुकांना पूर्ण न्याय देण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पायघड्या घालाव्या लागणार आहेत.

चौथा अंतिम सर्व्हे होणार; ‘‘चेकलिस्ट’’बाबत कमालीची गुप्तता…

प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर भाजपा वातावरण निर्मितीमध्ये एक पाऊल आहे. तीन सर्व्हे झाले आहेत. त्यानंतर आता चौथा आणि अंतिम सर्व्हे करण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुक उमेदवारांना ‘चेकलिस्ट’ देण्यात येणार आहे. सदर ‘चेकलिस्ट’ बाबत कमालीची गुप्तता आहे. स्थानिक भाजपाच्या प्रमुख नेत्यांनाही याबाबत पूर्ण कल्पना अद्याप दिलेली नाही. इच्छुक उमेदवारांना ‘चेकलिस्ट’ भरुन द्यावी लागेल. कोणत्या नेत्याचा समर्थक आहे. यापेक्षा भाजपाच्या तिकीटावर निवडून येण्याची क्षमता आहे का? या निकषावर तिकीट ‘कन्फर्म’ होईल, अशी यंत्रणा राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सर्व्हेचे काम त्रयस्थ एजन्सीकडून केले असून, स्थानिक पातळीवर हस्तक्षेप करता येणार नाही, याची पूर्णत: काळजी घेतली जात आहे.

भाजपचे आकडे बदलले; लक्ष्य ‘११० पार’

गेल्या पंचवार्षिकात भाजपचे ७७ नगरसेवक होते. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास वाढला असून पक्षाने आता ‘१०० पार’ ऐवजी ‘११० पार’ हे लक्ष्य ठरवले आहे. त्यामुळे नव्या कार्यकर्त्यांचे भविष्य उज्ज्वल वाटत असले तरी जुन्या दिग्गजांसाठी परिस्थिती अनिश्चित झाली आहे. मात्र, गोपनीय पद्धतीने केलेल्या ‘मेरिट सर्व्हे’ने भाजपच्या अंतर्गत वातावरणात धुके निर्माण केले आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारीवरून पक्षात मोठे वाद उद्भवण्याची शक्यता असून, निवडणूक मुख्यत: भाजपाच्या आतल्या स्पर्धेची बनण्याची चिन्हे दिसत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button