तीन घरफोड्यांमध्ये चोरटयांनी पळवला सव्वानऊ लाखांचा ऐवज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/theft.jpg)
मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे हॉटेल फोडल्याची घटना उघडकीस आली. पिंपरीगावात एका घरातून सोन्याचे दागिने चोरले. तर चाकण जवळ मेदनकरवाडी येथे एक दुकान फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी तळेगाव दाभाडे, मावळ आणि चाकण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 5) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
नितीन शिवाजी घारे (वय 44, रा. बेबेडओव्हळ, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे बेबडओव्हळ येथे शिवमंगल हॉटेल आहे. त्यांच्या हॉटेलच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एल एलईडी टीव्ही, साउंड, मिक्सर असा एकूण 24 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.
विजय जेठालाल भानुशाली (वय 40, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला. घरातून दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे 80 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 5) उघडकीस आली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
रेवननाथ पंढरीनाथ टाकळकर (वय 52, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे मेदनकरवाडी येथे यशस्वी इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून दुकानातून सहा लाख 35 हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेले. ही घटना 31 डिसेंबर रोजी उघडकीस आली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.