पिंपरी चिंचवडमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचे ४ हजार ८०० डोस गेले वाया
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम थंडावली आहे. शहरात आतापर्यंत साडेतीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. मात्र, त्यापैकी ४ हजार ८१० डोस वाया गेले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. महापालिकेची आणि खासगी अशा ८४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. मात्र, केंद्र सरकारकडून साठा मिळत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. महापालिकेने पंचवीस हजार लसीकरणाचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात साठा नसल्याने लसीकरण थांबले आहे.
सध्यस्थितीत कोवीशिल्डचे ३ लाख ११ हजार १०० तर कोव्हॅक्सीनचे ३४ हजार ८०० असे एकूण ३ लाख ४५ हजार ९०० लस उपलब्ध झाल्या होत्या. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या कोव्हिशील्डचे सर्वाधिक डोस मिळाले आहेत. त्या तुलनेत भारत बायोटेकने कमी डोस दिले आहेत.
कोव्हिशील्डचे ३ लाख १० हजार ८९० (९९.९३ टक्के प्रमाण) तर कोव्हॅक्सिनचे ३२ हजार ६१० (८४.९२ टक्के प्रमाण) डोसेसचे लसीकरण केंद्रांवर वाटप केले होते. कोव्हिशील्डचे ३ हजार १०० आणि कोव्हॅक्सिनचे १ हजार ७१० असे ४ हजार ८१० डोस वाया गेले आहेत. एकूण लसीकरणाच्या तुलनेत डोस वाया जाण्याचे प्रमाण १२ टक्के आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सध्या कोव्हिशील्डचे ९ हजार ०३२ आणि कोव्हॅक्सिनचे १५ हजार १४० असे २४ हजार १७२ लसीचे डोस शिल्लक आहेत. दोन दिवस पुरेल एवढाचा साठा उपलब्ध आहे.




