पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पे अँड पार्क पॉलिसी’ची अंमलबजावणी!
![Implementation of 'Pay and Park Policy' in Pimpri-Chinchwad!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/7a5b88d9-7c62-4c18-b507-e05876d85bf1.jpg)
- उद्योगनगरीतील वाहतूक व्यवस्थापन आता होणार सक्षम
- पार्किंग पॉलिसीमुळे महापालिकेच्या महसुलात वाढ होणार
पिंपरी । प्रतिनिधी
‘उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक व्यवस्थापनाला शिस्त लागावी. या हेतुने महापालिका प्रशासनाने आजपासून (दि.१ जुलै) ‘पे अँड पार्क पॉलिसी’ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता पिंपरी-चिंचवडकरांना वाहन पार्किंग करताना सावर्जनिक ठिकाणं आणि रस्त्यांवर नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
पुणे- मुंबई जुना माहार्गावरील महापालिका भवनसमोर गुरुवारी ‘पे अँड पार्किंग पॉलिसी’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिरानानी घुले, ड- प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, आयुक्त राजेश पाटील, बीआरटीएस विभागाचे श्रीकांत सवणे, उपअभियंता प्रमोद ओंबासे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरात १३ प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांखाली अशी एकूण ४५० ‘पे अँड पार्क’ची ठिकाण निवडली आहेत. ‘नो पार्किंग’मध्ये वाहन पार्क केल्यास आता वाहतूक पोलीस ऑनलाईन पद्धतीने २०० रुपयांचा दंड आकारणार आहेत.
‘‘पे अँड पार्क’ पॉलिसी राबवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित होता. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने याबाबतचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये बहुमताने मंजूर केला. त्यानंतर ‘पे अँड पार्क’ पॉलिसीच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे.
पार्किंग पॉलिसी राबवीत असताना आकारण्यात येणाऱ्या शुल्काची पावती इंम्पॉस मशीनद्वारे वाहनचालकांना देण्यात येणार आहे. त्यामुळे पारदर्शीपणे पार्किंग शुल्क आकरले जाईल. त्याचा हिशोब अचूकपणे महापालिका प्रशासनाला घेता येईल, असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.
शहराला फायदे काय?
– वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटणार.
– रस्त्यांवरील अतिक्रमणाला आळा.
– वाहतुकीला शिस्त लावता येईल.
– वाहतूक कोंडीमुक्त रस्ते होतील.
– बेवारस वाहनांचा प्रश्न सुटण्यास मदत
– वाहतूक पोलिसांना मदत होणार.
– बेकायदा पे पार्किंगला आळा बसेल.
शहरातील १३ मुख्य रस्ते व उड्डाण पुलांचा समावेश…
पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मे. निर्मला ऑटो केअर सेंटर या संस्थेची नियुक्ती केली आहे. याअंतर्गत १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलांचा समावेश आहे. यासह लगतच्या रस्त्यांचे दुसऱ्या टप्पयांमध्ये समावेश केला जाणार आहे. शहरातील सर्व पार्किंग ठिकाणांची माहिती सर्व नागरिकांना व वाहन चालकांना होण्यासाठी यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. तसेच नो पार्किंगच्या ठिकाणांच्या यादी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय (वाहतुक विभाग) प्रसिध्द करणार आहे.
पे अँड पार्कचे दर (प्रति तास) पुढीलप्रमाणे :
– दुचाकी आणि तीन चाकी – ५ रुपये
– चारचाकी – १० रुपये
– टेम्पो आणि मिनी बस – २५ रुपये
– ट्रक आणि खासगी बस – १०० रुपये
यासह रात्रीच्या पार्किंगसाठी शुल्क कपात केली जाणार आहे.