‘मी दररोज 10 मृतदेह 4 वेगवेगळ्या स्मशानभूमीत पोहचवायचो’, PMPML चालकाचा कोरोना काळातील अनुभव
![‘I used to take 10 bodies to 4 different cemeteries every day’, PMPML driver's experience in Corona period](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-12T182020.787.jpg)
पिंपरी चिंचवड | ‘मी दररोज 10 मृतदेह 4 वेगवेगळ्या स्मशानभूमीत पोहचवायचो, आयुष्य आणि मृत्यू इतक्या जवळून मी कधीच पाहिले नव्हते.’ असा अनुभव पीएमपीएमएल चालक विकास गाडगे यांनी विषद केला. कोरोना काळात आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल पीएमपीएमएलच्या वतीने त्यांचे आभार मानून गौरव करण्यात आला, त्यावेळी गाडगे बोलत होते.विकास गाडगे म्हणाले, ‘लॉकडाऊन लागताच एका महिन्याच्या आत पी.एम.पी.एम.एल. ने मला नेहरू नगर डेपोत काम करण्यासाठी बोलावलं. कोविड-19 महामारीच्या वेळी, जो अत्यंत भीतीदायक काळ होता, तेव्हा मी निडर होऊन निस्वार्थीपणाने काम केलं. मी दररोज 10 मृतदेह 4 वेगवेगळ्या स्मशानभूमीत पोहचवायचो. दिवस असो किंवा रात्र मला कधीही बोलावलं कि जावं लागायचं. जेव्हा कोरोनाची साथ आली, तेव्हा न घाबरता मला काम करण्याची एक वेगळीच ऊर्जा होती.’
जेव्हा कोविड -19 ची महामारी सुरु झाली, तेव्हा येणारा पुढचा काळ अनिश्चित व अस्थिर दिसत होता. मी कधीही आयुष्य आणि मृत्यू इतक्या जवळून पाहिले नव्हते. माझी बायको व पोरं सुद्धा प्रचंड घाबरलेले होते आणि माझे बाहेर पडणे फक्त त्यांची भीती वाढवत होत. परंतु घाबरून घरात बसणे शक्यही नव्हते आणि मला मान्यही नव्हते. शेवटी स्वतःच व कुटुंबाच पोट भरण्यासाठी मला बाहेर पडणे गरजेचेच होते.
मी घेतलेली कामाची जबाबदारी पूर्ण करणे गरजेचे होते म्हणून भीतीने कवटाळून घरी न बसता, मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आणि भीती व समस्यांशी लढून दिलेले काम योग्य वेळेत पूर्ण केले. कोविडचा काळ हा सर्वांसाठीच कठीण होता. अशा परिस्थितीत आपण एकमेकांची मदत करणे गरजेचे होते आणि पुढे देखील एकमेकांची मदत करणं गरजेचं आहे.’ असे गाडगे म्हणाले.