गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘हुन्नर १.०’ कलामहोत्सव दिमाखात संपन्न
विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारली सर्जनशीलता; मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी चिंचवड : गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘Hunar 1.0’ हा दोन दिवसीय भव्य कलामहोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. देशभक्ती, भारतीय संस्कृती आणि सर्जनशीलता यांचा सुरेख संगम या प्रदर्शनात पाहायला मिळाला.
दिमाखदार उद्घाटन
या कलामहोत्सवाचे उद्घाटन शाळेच्या व्यवस्थापकीय संचालिका व माजी नगरसेविका सौ. कविताताई कडू-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली भागवत आणि विपणन अधिकारी शैलेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांनी मान्यवरांसह पालकांचीही मने जिंकली. शाळेच्या भिंती जणू या चित्रांच्या माध्यमातून बोलू लागल्याचा भास उपस्थितांना होत होता.
हेही वाचा – राज्यस्तरीय युनिफाईट ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’च्या विद्यार्थ्यांची निवड

सर्वांगीण विकासासाठी ‘व्यासपीठ’
कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना शाळेचे अध्यक्ष मा. श्री. विनायक भोंगाळे म्हणाले की, “हुन्नर १.० या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अशा उपक्रमांतून मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि कल्पकता वाढीस लागते, जी त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे.”
पालकांकडून कौतुक
या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, कला शिक्षक, संपूर्ण शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. हा उपक्रम केवळ प्रदर्शन नसून मुलांसाठी एक प्रेरणादायी अनुभव ठरला, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. या दोन दिवसीय कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना शोधून त्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे. ‘हुन्नर १.०’ च्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीचे जे दर्शन घडवले आहे, ते कौतुकास्पद आहे. भविष्यात हेच विद्यार्थी कलेच्या जोरावर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करतील, असा मला विश्वास आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमची संस्था सदैव कटिबद्ध राहील.”
— श्री. विनायक भोंगाळे
(संस्थापक अध्यक्ष, गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल)




