पिंपरी-चिंचवडमध्ये शेकडो मिळकतधारकांचे धनादेश झाले ‘बाऊन्स’, महापालिकेच्या फसवणूकीमुळे होणार फाैजदारी दाखल
![Hundreds of property owners' checks bounced in Pimpri-Chinchwad, fraud will be filed due to NMC fraud](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/pcmc-13.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवडमध्ये शेकडो मिळकतधारकांनी महापालिकेची थकबाकी वेळेत न भरल्यास मालमत्ता जप्त होण्याची भिती असते. त्यामुळे अनेकांनी धनादेश देऊन वेळ मारुन नेली. मात्र, शहरातील सुमारे तीनशे मिळकतधारकांनी कर धनादेशाच्या स्वरुपात दिला. त्यापैकी दोनशेहून अधिक मिळकतधारकांचे चेक बाऊन्स झाले आहेत. त्यामुळे येत्या 15 जूनपर्यंत चेक बाऊन्सची रक्कम न भरणाऱ्या या थकबाकीदारांवर करसंकलन विभागाकडून फसवणूक करणाऱ्या थकबाकीदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील मिळकतींची करसंकलन विभागामार्फत कर आकारणी करुन, मिळकत कर वसूल केला जातो. हा कर नागरिकांकडून रोख रकमेबरोबरच धनादेश, डी.डी., आर.टी.जी.एस., एन.एफ.टी., यु. पी. आय, इ.डी.सी. अशा विविध माध्यामतून स्वीकारला जातो. करआकारणी व कर संकलन विभागामार्फत सन 2020-21 च्या अंदाजपत्रकीय मिळकतकर वसुलीचे 870 कोटींचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जानेवारी 2021 ते मार्च 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत विविध सवलत योजनामसह वसुलीची मोहीम, राबविण्यात आली.
या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळकतधारकांकडे वसुलीसाठी जप्तीची मोहिम राबविण्यात आली. या कारवाईचा धसका घेतल्याने जप्तीपुर्वी व जप्तीनंतर थकीत मिळकतकर भरण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक नागरिकांनी मिळकतकराच्या रकमेचा चेक जमा केले आहेत. या तीन महिन्यांत चेकच्या माध्यमातून मिळकतकर भरणाऱ्यांची संख्या 300 च्या आसपास अहे. मात्र, जवळपास 70 टक्के म्हणजे 200हून अधिक चेक बाऊन्स झाले आहेत. यानंतर महापालिकेच्या करसंकलन विभागाने संबंधित नागरिकांना नोटीस बजावून मिळकत भरण्याबाबतचा पाठपुरावा सुरु आहे. यानंतरही लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या काही नागरिक व संस्थाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या नागरिकांना 15 जूनपर्यंत थकीत मिळकतकराचा भरणा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अन्यथा या मिळकत धारकांवर महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
थकबाकीदारांनी दिलेले चेक बाऊन्स झाल्यानंतर नोटीस बजावूनदेखील त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. या नागरिकांना दिलेल्या मुदतीमध्ये मिळकत कर न भरल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
स्मिता झगडे, – उपायुक्त, कर संकलन विभाग