अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर
गोविंदाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली,सध्या त्याच्यावर उपचार सुरू
मुंबई : अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेता गोविंदाच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि ती त्याच्या पायाला लागली आहे. या घडलेल्या घटनेनंतर त्याला मुंबईतील क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गोविंदावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती बरी असल्याची माहिती मिळत आहे.
आज मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ही घटना गोविंदाच्या हातून घडली. गोविंदाकडे परवाना असलेली बंदुक आहे. मात्र ती तपासत असतानाच त्याच्याकडून चुकून त्या बंदुकीतून गोळी सुटल्याची माहिती समोर येत आहे. गोविंदा एका कामानिमित्त कोलकाताला जाण्यासाठी घरातून निघत होता. त्यावेळी तो नेहमीप्रमाणे परवाना असलेली बंदुक स्वत:सोबत घेत होता. ही बंदुक त्याच्या हातातून निसटली आणि त्यातून त्याच्या पायाला गोळी लागली. डॉक्टरांनी गोविंदाच्या पायातून गोळी काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.