महिला बचत गटाच्या कार्यक्रमात आरोग्यविषयक मार्गदर्शन
पिंपरी / महाईन्यूज
बसवेश्वर व वीरशैव महिला बचत गटातर्फे महिला दिनानिमित्त नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शुभांगी म्हेत्रे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम प्राधिकरणातील बसवेश्वर भवन येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शुभांगी म्हेत्रे यांचे बसवेश्वर माळी समाजाचे अध्यक्ष आप्पासाहेब वाले यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना डॉ. म्हेत्रे म्हणाल्या, महिलांनी आपल्या दिनचर्येची विशेष काळजी घ्यावी असे सांगत आहार, विहार व व्यायाम कसा असावा याबाबत सविस्तर माहिती दिली. महिला दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा मंजुषा माळी यांनी करून दिला.
हर्षदा माळी यांनी पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्लॅस्टिक संकलनाचे महत्त्व सांगितले. त्या गेली दोन वर्षापासून प्लॅस्टिक संकलन करत आहेत. सर्व महिलांनी प्लॅस्टिक संकलन करावे असे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना हर्षदा माळी यांनी केली. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी यावेळी पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन हर्षदा माळी, मंजुषा माळी, पूनम माळी, मानसी माळी, मेघा माळी, राणी माळी आदींनी केले.