मॅगझिन चौकातील साकारले पालखी सोहळ्याचे समुहशिल्प
![Group sculpture of Sakarle Palkhi ceremony at Magazine Chowk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/WhatsApp-Image-2022-06-21-at-7.22.29-PM.jpeg)
- माजी नगरसेवक विकास डोळस यांचा पाठपुरावा
- पालखीच्या स्वागतच्या निमित्ताने प्रशासनाकडून लोकार्पण
पिंपरी । प्रतिनिधी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी पालखी मार्गावर मॅगझिन चौक येथील पालखी यात्रा समुहशिल्पाचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. भाजपाचे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी पालखी मार्गावर वारकरी सांप्रदायाचे प्रतिक असलेला समुहशिल्प उभारावे, अशी मागणी केली होती. त्याला यश मिळाले आहे. त्यामुळे दिघी आणि परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरी पर्यावरण आणि सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शहरात १५ ठिकाणी शिल्पे बसवण्यात आली आहेत. टाकाऊवस्तुंपासून ही शिल्पे साकारली आहेत. पालखी मार्गाच्या विकासानंतर बीआरटी मार्गावरील चौकात वारकरी सांप्रदायाची साक्ष देणारी शिल्पे उभारली जावीत, अशी मागणी तत्कालीन नगरसेवक विकास डोळस यांनी केली होती.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून ‘स्वच्छाग्रह मोहीम’ सुरू केली आहे. त्याअंतर्गत शहर स्वच्छतेसह वस्तुंचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून वस्तुंचा पुनर्वापर करुन शहराचे सौंदर्य वाढविण्यावर भर दिला जात आहे.
विकास डोळस म्हणाले की, औद्योगिकनगरी, कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची गौरवशाली परंपरा कला, उद्योग, संस्कृती यांची साक्ष देणारी शिल्पे साकारली, तर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. या कलाकृतींचे आयुर्मान कमीत-कमी २५ वर्षे आहे. हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम असून, भोसरी- आळंदी रोड मॅगझिन चौक येथे पालखी यात्रा शिल्प उभारण्यात आले. श्रीक्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा मार्गस्थ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर या शिल्पाचे लोकार्पण होत आहे, याचे समाधान वाटते.
- स्थानिक लोप्रतिनिधींना विश्वासात घ्या : आमदार लांडगे
आमदार महेश लांडगे म्हणाले की, महापालिकेच्या ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांची भंगार साहित्यातून आकर्षक भित्तीचित्रे निर्माण केली आहे. ती भिंतीचित्रे पालिका भवनात लावण्यात आली आहेत. तसेच, उद्यान विभागाने भंगार साहित्यातून कुंड्या व इतर साहित्य बनवले आहे. त्यात फुलझाडे लावून आकर्षक रचना तयार करण्यात आल्या आहेत. शहरातील काही शाळा शून्य कचरा संकल्पना राबविण्यात यशस्वी झाल्या आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र, शिल्प उभारताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, असे सूचनाही आमदार लांडगे यांनी केली आहे.