Ground Report : चिंचवडकरांची खंत… सर्व प्रकल्प भोसरीत अन् आमच्या वाट्याला खड्डेच?
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांची नाराजी : भोसरीच्या तुलनेत चिंचवड मतदारसंघात विकासप्रकल्प दिसेनात!
![Ground Report : Chinchwadkar's regret... all the projects in Bhosri and our share only pits?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Dattarray-Deshmukh-780x470.jpg)
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे आम्ही सर्वाधिक टॅक्स भरत असताना, सर्व प्रकल्प मात्र भोसरी विधानसभा मतदार संघात राबवले जात आहेत. आम्ही केवळ खड्डेच पहायचे का? असा संतत्प सवाल पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये गुरूवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदार महेश लांडगे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांवर सकारात्मक चर्चा झाली.
विशेष म्हणजे, केंद्र सरकारच्या प्रतिथयश शैक्षणिक संस्थांपैकी एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) शाखा शहरात उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय झाला. एकूण ७० एकर जागेत ही संस्था सुरू होणार असल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची ओळख जागतिक पातळीवर शैक्षणिक क्षेत्रात निर्माण होणार आहे. याबाबत सर्वच प्रसारमाध्यमे वृत्तांकन झाले आणि सोशल मीडियावर ‘पोस्ट’ व्हायरल होवू लागल्या आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड विकास महासंघाच्या ‘व्हॉट्सॲप ग्रुप’वर अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी अत्यंत मार्मिक टिपण्णी केली आहे. ‘‘नक्कीच छान बातमी आहे, मनापासून अभिनंदन. परंतु, एक शहरात फार दुजाभाव होत आहे, असे नेहमी वाटते. सर्वात जास्त टॅक्स भरायचा चिंचवडकरांनी आणि मोठे रोड, कमिशनर ऑफीस, मोठे गार्डन, आत्ता कॉलेज कुठे, तर भोसरीकडे आणि चिंचवडकर कुठे खड्डयात..!’’ अशी निराशा व्यक्त करणारी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.
आमदार लांडगे विरोधकांच्या डोळ्यांत अंजन…
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी मतदार संघामध्ये गेल्या १० वर्षांमध्ये विकास केला नाही. भोसरीकडे बकालपणा वाढला किंबहुना चिंचवड आणि पिंपरीच्या तुलनेत भोसरी विकासात मागे राहिली असा आरोप जाहीरपणे विरोधकांकडून केला जातो. मात्र, शहरातील प्रामाणिक करदात्या सोसायटीधारकांच्या फेडरेशनचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांच्या एका पोस्टमुळे ‘…हा सूर्य… हा जयद्रथ’ समोर आला. विकासकामांच्या बाबतीत भोसरीकर आघाडीवर आहेत, या वस्तुस्थितीवर त्यांनी थेट प्रकाश टाकला आणि शिक्कामोर्तब केले. ‘‘भ्रष्टाचार, दहशत… बकालपणा… ’’ असे वजनदार शब्द वापरुन ‘FAKE NARRATIVE’ सेट करणाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये ही बाब अंजन घालणारी आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.