पिंपरीत १४-१५ मार्चला ‘ग्रंथोत्सव-२०२५’; ग्रंथदिंडी ते व्याख्यानांचा कार्यक्रम

पिंपरी | उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे ‘ग्रंथोत्सव-२०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. १४ व १५ मार्च २०२६ या दोन दिवसांत आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय, पिंपरी कॉलनी, महर्षी दयानंद मार्ग येथे हा ग्रंथोत्सव पार पडणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक व साहित्यिक प्रा. डॉ. शरद गायकवाड असणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रेया गोखले यांनी दिली. या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, पुस्तक विक्री तसेच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या उपस्थितीत ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे.
हेही वाचा : मुंबई शेअर बाजाराची ५०० अंशांनी झेप; आठवडाभराच्या घसरणीनंतर सेन्सेक्समध्ये तेजी
शनिवारी (१४ मार्च) सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून पिंपरी परिसरातील शालेय विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. दुपारी ३ ते ४ या वेळेत ‘लोकमाता ते राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या विषयावर डॉ. अनुजा कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच दुपारी ४ ते ५.३० या वेळेत ‘गझल : वाटचाल उर्दूतून मराठीकडे’ या विषयावर प्रदीप निफाडकर यांचे माहितीपर व्याख्यान होईल.
रविवारी (१५ मार्च) सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत ‘कलाविष्कार’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे कला गुण सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता ‘चला समृद्ध पिढी घडवूया : वाचन संस्कारांच्या माध्यमातून’ या विषयावर जि.प. शिक्षिका सीमा शिंदे विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ४ वाजता ‘इनुची गोष्ट’ या पुस्तकाचे लेखक युनूस सय्यद यांची प्रकट मुलाखत लेखिका आशा नेगी घेणार आहेत.
या दोन दिवसीय ग्रंथोत्सवात विविध नामांकित प्रकाशकांच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असून प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व नागरिक व ग्रंथप्रेमी रसिकांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





