TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

म्हातोबाच्या नावानं चांगभलं.. हिंजवडीत बगाड मिरवणूक उत्साहात

पिंपरी : कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्ष खंड पडलेली बगाड मिरवणूक यंदा म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा जयघोष करत मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी हिंजवडी, वाकडसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी ऐतिहासिक बगाड मिरवणूक पहायला गर्दी केली होती.

हिंजवडीचे ग्रामदैवत तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हातोबा देवाच्या पारंपरिक बगाड मिरवणूकीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला पारंपारिक पद्धतीने बगाड मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. यंदा, शनिवार (दि.१६) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास हालगी तुतारीच्या कडाडणाऱ्या आवाजात, खोबरे भंडाऱ्याची उधळण करत बगाड मिरवणूक सुरु झाली.

यावेळी, सहभागी ग्रामस्थांनी पैस.. पैस.. म्हातोबाच्या नावानं चांगभलंचा एकच जयघोष करत परिसर दणानून सोडला. दरम्यान, प्रथेप्रमाणे हिंजवडी गावठाण येथील होळी पायथा मैदानात बगाडाचे मानकरी आणि ग्रामस्थ एकत्र येतात. परंपरेनुसार गळकरी होण्याचा मान जांभूळकर वाड्यातील तरूणांना असल्याने, मान्यवरांकडून यंदा गळकरी म्हणून रामदास शिवाजी जांभुळकर निवड घोषित करण्यात आली.

साखरे यांनी गळकऱ्याला गळ टोचला, संदेश साखरे आणि दीपक साखरे यांना यंदा खांदेकरी होण्याचा मान मिळाला. सायंकाळी पाचच्या सुमारास खांदेकऱ्यांनी गळकऱ्याला होळी पायथा मैदानावर आणले आणि कडाडनाऱ्या हालगीच्या आवाजात पैस पैस .. म्हातोबाच्या नावानं चांगभलंच्या एकच जयघोष करत बगाड मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत बगाड हिंजवडी गावठाण, कस्तुरी चौक, भुमकर वस्ती, केमसे वस्ती, वाकडकर वस्ती, भुजबळ वस्तीमार्गे वाकड गावामध्ये दाखल झाले. बगाड मार्गावर जागोजागी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सरबत, थंडगार पाण्याची सोय कारण्यात आली होती. वाकड मधील म्हातोबाच्या मंदिरात बगाड मिरवणुकीची पारंपारिक पद्धतीने सांगता करण्यात आली. बगाड मार्गा दरम्यान ठीक ठिकाणी वाहतूक वाळवीण्यात आली होती, हिंजवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button