शाहूनगरमध्ये गंठन, मोशीमध्ये मोबाईल हिसकावला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/CHAIN-SNACHING_01.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
शाहूनगर चिंचवड येथे एका महिलेचे गंठन चोरट्यांनी हिसकावले. तर मोशीमध्ये एका व्यक्तीचा मोबाईल फोन हिसकावून नेला. या दोन्ही घटना गुरुवारी (दि. 24) घडल्या आहेत.
शाहूनगर येथील घटनेत एका महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास शाहूनगर येथील दत्त मंदिरासमोर दुचाकीवर थांबल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले.
देहू-आळंदी रोड, मोशी येथे दुसरी घटना घडली आहे. प्रदीप बबन म्हस्के (वय 33, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हस्के गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास देहू-आळंदी रोडने पायी चालत जात होते. त्यावेळी ते मोबाईल फोनवर बोलत असताना एका दुचाकीवरून तिघेजण आले. त्यातील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या हातातील 35 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.