शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने साडेसहा लाखांची फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Financial-Cheating.jpg)
शेअरमार्केट मधून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला काही रुपये नफा देऊन एका व्यक्तीची साडेसहा लाखांची फसवणूक केली. ही घटना 24 जून 2020 रोजी सकाळी वाकड येथे घडली.
प्रशांत दिलीप दलाल (वय 33, रा. वाकड) यांनी याप्रकरणी 8 मार्च 2022 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजवर्धन मोबाईल नंबर 9754370853, कस्टमर केअर मोबाईल नंबर 9111006529, 6262030232, अकाउंट सेक्शन दीपक 9754366317, मॅनेजर राहुल 6262028422 यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजवर्धन याने त्याच्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी यांना संपर्क करून शेअर मार्केट बाबत टिप्स देऊन नफा मिळवून देतो असे सांगितले. राजवर्धन याने त्याच्या बँक खात्यावर फिर्यादी यांना पैसे भरण्यास सांगून सुरुवातीला चार लाख 40 हजार रुपये, डी मॅट खात्यावरील दोन लाख रुपये, आयएमपीएस द्वारे 48 हजार रुपये असे एकूण सहा लाख 88 हजार रुपये भरण्यास लावले. त्यानंतर प्रथम 20 हजार आणि दुस-या वेळी 20 हजार असे 40 हजार रुपये नफा देऊन त्यानंतर कोणतीही रक्कम न देता फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.