ठार मारून मगरीला खाऊ घालण्याची धमकी देत गॅरेज चालकाकडून खंडणी घेतल्याप्रकरणी नाना गायकवाड पिता पुत्रासह चौघांवर गुन्हा दाखल
![Four persons, including Nana Gaikwad's father and son, have been booked for threatening to kill a crocodile and feed it to a garage driver.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/crime-registered-patangbaj_202101544305-e1625639033763-1-3.jpg)
पिंपरी चिंचवड | गॅरेज चालकाला व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून नाना गायकवाड पिता पुत्र आणि अन्य दोघांनी गॅरेज चालकाला फार्म हाऊसवर नेऊन पिस्तूलाचा धाक दाखवला. व्याजाचे पैसे मागत ठार मारून मगरीला खाऊ घालण्याची धमकी दिली.तसेच गॅरेजमधून तीन महागड्या कार आणि साहित्य असे 25 लाख 60 हजारांचे साहित्य जबरदस्तीने नेले. ही घटना जानेवारी ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत विशालनगर, पिंपळे निलख येथे घडली.नानासाहेब शंकरराव गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध, पुणे), राजाभाऊ अंकुश, अॅड. नाणेकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत गॅरेज चालक विठ्ठल शिवानंद गुरव यांनी सोमवारी (दि. 23) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विशालनगर पिंपळे निलख येथे कार हब नावाचे गॅरेज सुरू केले होते. ते महागड्या कारची दुरुस्ती करत होते. त्यांना गॅरेजसाठी आवश्यक असणारी मशिनरी, साहित्य आणण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यातील 80 लाख रुपये त्यांनी जमवले. तरीही त्यांना आणखी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्याकडून सुमारे 35 लाख रुपये व्याजाने कर्ज घेतले. त्यातील 28 लाख रुपये फिर्यादी यांनी आरोपींना परत केले होते.
आरोपी त्यांच्या गाड्या फिर्यादी यांच्याकडून फुकट दुरुस्त करत होते. आरोपींकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज थकल्याच्या कारणावरून आरोपी यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष व फोनवरून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी अॅड. नाणेकर याने फिर्यादीस झाले व्यवहाराची 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करुन नोंदवून घेतले. त्यातील मजकुर वाचायला न देता त्यावर फिर्यादी यांची सही घेतली.फिर्यादी यांना जबरदस्तीने पांढ-या रंगाच्या रेंज रोव्हर (जे एच 10 / ए के 4444) या गाडीतून औंध येथील घरातून सूस पुणे येथील आरोपीच्या एन एस जी फार्म हाऊसवर नेले. तेथे पुन्हा जीवे ठार मारण्याची धमकी देवून आरोपी नानासाहेब आणि राजाभाऊ यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांना पिस्टल दाखवून दहशत निर्माण करण्यासाठी हवेत तीनवेळा गोळीबार केला.
त्यानंतर सुमारे 15 दिवसांनी फिर्यादी यांच्या कार हब या गॅरेजवर 15 माणसांसह तसेच एक ट्रक व दोन टेंपोसह आरोपी आले. फिर्यादी यांना गॅरेजवर बोलवून घेवून आरोपी राजाभाऊने फिर्यादी यांना हाताने मारहाण करून खाली पाडले. फिर्यादीच्या छातीवर बसुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून गॅरेज मधून 25 लाख 60 हजार रुपयांचे गॅरेजचे साहीत्य व मशीनरी तसेच गॅरेजमधील तीन कार जबरदस्तीने नेले. कोणतेही सावकारी परवाना नसताना बेकायदेशीररित्या आरोपींनी स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी जबरदस्तीने मुद्देमाल नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी यांना ठार मारून आरोपीने त्याच्या फार्म हाऊसवरील विहिरीत असलेल्या मगरिंना खाऊ घालण्याची धमकी दिली.आरोपी नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे करीत आहेत.