दापोडी येथे नदीत पडलेल्या मुलाचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले

पिंपरी : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज दुपारच्या सुमारास पुणे शहराकडे प्रस्थान होत असताना पिंपरी चिंचवड शहराच्या वेशीवरती असलेल्या दापोडी येथील मुळा नदीच्या पुलावरून एक मुलगा तोल जाऊन पाण्यात पडला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी या मुलाचे प्राण वाचवले.
वेदांत बोत्रे असं या १६ वर्षीय मुलाचे नाव आहे. वेदांत हा फोटो स्टंट करताना मुळा नदीच्या पुलावरून पाण्यात पडला होता. पाण्यात पडल्यावर तो नदीचा प्रवाह जास्त असल्याने तसेच नदीमध्ये असलेल्या बांधकामांच्या पिलरच्या लोखंडी कॉलमला अटकून राहिला होता.
हेही वाचा – ‘मुलाचं नाईट लाइफ कमी केलं असतं तर..’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं जोरदार प्रत्युत्तर
याबाबतची माहिती मिळताच तात्काळ पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेदांत याला बोट आणि ओबीएमच्या सहाय्याने सुखरूप पाण्यातून बाहेर काढून त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे.
या बचाव कार्यात अग्निशामक दलाचे अधिकारी गौतम इंगवले, विकास नाईक, रुपेश जाधव, प्रथमेश भोसले फायरमन, विशाल चव्हाण फायरमन, आविष्कार पिसाळ ट्रेनिंग फायरमन व इतर कर्मचारी सहभागी झाले होते.





