नाशिक फाटा उड्डाणपूलासाठी घेतलेल्या कर्जामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान; दोषींवर कारवाई करण्याची मारुती भापकर यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/www.mahaenews.com-74-1-780x470.jpg)
पिंपरी ; नाशिक फाटा दुमजली उड्डाणपुलाच्या कामासाठी जागतिक बँकेकडून सन २०१५ मध्ये १५९ कोटी ११ लाख रुपये कर्ज घेण्यात आले होते. या कर्जामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
मारुती भापकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कासारवाडीतून भोसरीच्या दिशेने जाणारा व भोसरीकडून, पिंपळे गुरव भागाला जोडणारा अशा दोन उड्डाणपूलांच्या कामासाठी सन २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात महापालिकेची आर्थिक परिस्थिती मजबूत असताना १५९ कोटी ११ लाख रुपयांचे जागतिक बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतला. महापालिकेने हे कर्ज जागतिक बँकेकडून घेतले. हे कर्ज २५ वर्षे फेडावे लागणार आहे. हे कर्ज डॉलर मध्येच फेडायचे आहे. भविष्यात डॉलरचा भाव जसा वाढत जाईल तशी तशी या कर्जाची रक्कम वाढणार आहे. डॉलरनुसार परतफेडीच्या जाचक अटीमुळे हे कर्ज तब्बल ३० टक्के वार्षिक व्याजदराने पडत आहे. भारतातील राष्ट्रीय बँकेचा व्याजदर ७ ते १४ टक्के असताना हा ३० टक्क्याच्या दराने कर्ज घेण्याचा निर्णय कोणाच्या सुपीक डोक्यातून आला? यामुळे महापालिकेचे किती आर्थिक नुकसान झाले? याला जबाबदार कोण? असा सवाल भापकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा – “सेवानिधी समर्पण हा सामाजिक कृतज्ञतेचा वस्तुपाठ”
त्यांनी पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे हे कर्ज एक रकमी फेडण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. मात्र या कर्जाच्या अटी शर्थी नुसार हे कर्ज जागतिक बँक स्वीकारत नाही. महानगरपालिकेने जागतिक बँकेकडून १५९ कोटी ११ लाखांचे कर्ज जानेवारी २०१५ मध्ये घेतले होते. आत्तापर्यंत महापालिकेने ११० कोटी रुपये हे कर्ज फेडले आहे. अद्याप २०७ कोटी रुपये कर्ज फेडायचे आहे. डॉलरची किंमत जशी जशी वाढत जाईल तशी तशी या कर्जापोटी वाढणारी रक्कम महापालिकेला फेडावी लागणार आहे.
हे कर्ज घेण्याच्या करारनामा कोणी केला? या प्रक्रियेचा सल्लागार कोण होता? महापालिकेचे कायदा सल्लागार, लेखापाल, लेखापरीक्षक यांची नक्की काय जबाबदारी होती? या प्रक्रियेत कोण कोण अधिकारी, पदाधिकारी सहभागी होते? ही सगळी प्रक्रिया राबवत असताना महापालिका कायदे सल्लागार व या निर्णयास सहभागी असणाऱ्या लोकांनी आपली बुद्धी गहाण टाकली होती काय? या सगळ्या प्रक्रियेमध्ये आर्थिक देवाण- घेवाण होऊन भ्रष्टाचार झाला आहे काय? महापालिकेला कर्जबाजारी करण्याचे पाप नेमके कोणाचे? महापालिकेला कर्जबाजारी करून आपल्या तुंबड्या भरणाऱ्या संबंधित भ्रष्ट लोकांची, या एकूणच या सर्व संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी. तसेच महापालिकेचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करावे अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.