शहरातील ‘रेड झोन’च्या मोजणीला अखेर ‘मुहूर्त’
आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Untitled-design-50-780x470.jpg)
स्थायी समितीकडून मोजणी खर्चाला मिळाली मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रेड झोनची मोजणी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. या विषयासह महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी मंजूरी दिली. आमदार महेश लांडगे यांनी यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, विजयकुमार खोराटे तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – संत्रा उत्पादकांसाठी खुशखबर! राज्यात ८ आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्यास मान्यता
संरक्षण विभागाच्या देहू ॲम्युनिशन डेपो व दिघी मॅगझिन डेपो भागातील रेड झोनचे मार्किंग झालेले नाही. त्यामुळे रेड झोनची मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करावे. या करिता जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे आमदार लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. यासाठी पुण्यात बैठकही झाली होती. मध्यंतरी अधिवेशनाच्या काळातही यावर चर्चा झाली होती. दरम्यान, लवकरच मोजणीचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
निगडी, यमुनानगर, कृष्णानगर, ट्रान्सपोर्टनगर, सेक्टर २०, २१, २२, २३ व २४ परिसरातील ‘रेड झोन’ची हद्द निश्चितीबाबत अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे. या भागातील सुमारे सात हजार कुटुंबांना बांधकाम परवानगी, महसुली कागदपत्रे, वारसा नोंदी याबाबत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरातील ‘रेड झोन’ ची हद्द निश्चिती आणि नकाशा प्रसिद्ध करण्याबाबत जिल्हा प्रशासन, संरक्षण विभाग आणि महापालिका प्रशासनाने एकत्रितपणे सकारात्मक पुढाकार घ्यावा. या करिता आम्ही पाठपुरावा करीत आहोत. महापालिका प्रशासनाने मोजणीच्या खर्चाला मान्यता दिली. यापुढील कार्यवाही प्रशासनाने तातडीने करावी, अशी अपेक्षा आहे.
– महेश लांडगे, आमदार,भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.