फ प्रभागातील बदल्यांवरून नवा वाद
भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांचा राजकीय दबावाचा आरोप
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या फ प्रभागात मजूर पदांच्या बदल्यांवरून नवा वाद उद्भवला आहे. नियुक्ती आदेश असूनही प्रत्यक्ष बदल्यात फेरफार झाल्याचा गंभीर आरोप भाजपा शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केला आहे.
अधिकृत आदेशानुसार दत्तात्रय मारुती जामदार यांची नियुक्ती अतिक्रमण विभागात करायची होती. मात्र, त्यांना विद्युत विभागात पाठवण्यात आले आणि त्यांच्या जागी बाळासाहेब माणिक लोढे यांची अतिक्रमण विभागात नियुक्ती झाली. हा बदल राजकीय दबावामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘भारताने पाकिस्तानची ६ विमाने नष्ट केली’; भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांचे मोठे विधान
फ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी कोणतीही लेखी चौकशी न करता तात्काळ आदेश बदलल्याने प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणाची माहिती आयुक्त शेखर सिंह यांना देऊन, कागदपत्रांची तपासणी करून योग्य कारवाईची मागणी काळभोर यांनी केली आहे.
सदर वादामुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय प्रक्रिया आणि निर्णयक्षमता राजकीय दबावाखाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, तर नागरिकांमध्येही नाराजी वाढत आहे.




