कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना ‘थम्ब इम्प्रेशन’मधून सवलत
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या प्रमुख पाच पदाधिकाऱ्यांना बायोमेट्रीक ‘थम्ब इम्प्रेशन’मधून पूर्णतः सवलत देण्यात आली. पदधारण कालावधी असेपर्यंत ही सवलत असणार आहे. या पदाधिकाऱ्यांना विभागातील हजेरी पत्रकावर दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.महापालिकेच्या अस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशन, फेस रिडिंग मशिनद्वारे उपस्थिती नोंदविणे सक्तीचे तसेच हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी बायोमेट्रीक ‘थम्ब इम्प्रेशन’ प्रणालीतून सवलत देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सवलत देण्यात येत आहे. पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाच्या पदधारण कालावधीपर्यंत बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन फेस रिडींगप्रणाली मधून पूर्णतः सवलत देण्यात आली. परंतु, त्यांना विभागातील हजेरी पत्रकार दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील. या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांना महापालिका अधिकालीन भत्ता, फिरती भत्ता, सार्वजनिक सुट्ट्यांचे वेतन इत्यादी आर्थिक लाभ देय राहणार नाही. फक्त हजेरीपत्रक अहवालानुसार दरमहाचे वेतन अदा केले जाईल.
महासंघाच्या इतर पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना संघटनेच्या कामासाठी ज्या दिवशी महासंघाच्या सकाळी सभा, प्रशिक्षण इतर आवश्यक त्या कामासाठी थम्ब इम्प्रेशन, फेस रिडींगद्वारे उपस्थिती नोंदविणे शक्य नसेल. त्यावेळी पदाधिकाऱ्यांची आदल्या दिवशी कार्यालयात उशीरा येणे/लवकर जाणे या रजिस्टर मध्ये नोंद घ्यावी. कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळी कार्यालयात पुन्हा उपस्थित होतील, त्यावेळी थम्ब करावा. तसेच ज्या दिवशी दुपार नंतर असे कार्यक्रम असतील. पुन्हा कार्यालयात येणे शक्य नसेल त्यावेळी तशी नोंद रजिस्टर मध्ये घेऊनच कार्यक्रमास जाताना थम्ब करून जावे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये पूर्ण दिवस कार्यक्रमास जाणे आवश्यक असल्यास तशी नोंद आदल्या दिवशी / शक्य नसल्यास दुस-या दिवशी रजिस्टरमध्ये घ्यावी. या नोंदी वेळच्यावेळी शाखा प्रमुखांनी / आहरण वितरण अधिकारी यांनी दैनंदिन प्रमाणित करणे आवश्यक राहील. या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. पदाधिकाऱ्यांना हजेरी पत्रकार दैनंदिन स्वाक्षरी करणे बंधनकारक राहील.
पदाधिकाऱ्यांना महासंघाचे कामाच्या अनुषंगाने सवलत घेतलेल्या दिवसाचे आर्थिक लाभ देय राहणार नाहीत. महासंघातील पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे कार्यालयीन कामकाज केले असेल. तर, त्यांना मनपा अतिकालिन भत्ता, फिरती भत्ता, सार्वजनिक सुट्ट्यांचे वेतन इत्यादी भत्ते अदा करतेवेळी थम्ब उपस्थितीचा अहवाल व हजेरी अहवाल विचारात घेवूनच केलेल्या कामकाजाचे कार्यालयीन नोंदीवरून नियमानुसार आर्थिक लाभ देव राहतील. हा आर्थिक लाभ अदा करतेवेळी बायोमेट्रीक थम्ब उपस्थिती अहवाल, हजेरी अहवाल आणि रजिस्टर मधील नोंदी विचारात घेण्यात येणार आहेत. महासंघातील पदाधिकारी / कार्यकारिणी सदस्यांना बायोमेट्रीक थम्ब इम्प्रेशन / फेसरीडिंग मधील सवलत पदधारण कालावधीत असेपर्यंत राहणार आहे.