उद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी राजशिष्टाचार पाळावा – संजोग वाघेरे पाटील
![Etiquette for Inauguration Ceremony - Sanjog Waghere Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Untitled-design.jpg)
- पालकमंत्री अजितदादांना सन्मानाने निमंत्रित करावे
- भाजपला श्रेयाची घाई, आयुक्तांनी घ्यावी खबरदारी
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) |
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विकासकामांचे उद्घाटन सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली राजशिष्टाचाराचे पालन न करता केले जाते. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून होणा-या कोणत्याही कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना निमंत्रित करून राजशिष्टाचाराचे पालन करावे. सत्ताधा-यांना श्रेय घेण्याची घाई झालेली आहे, परंतु महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ही खबरदारी घ्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वाघेरे पाटील पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी सत्ता दिल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पाच वर्षे शहराकडे दुर्लक्ष केले. शहराच्या विकासकामांसाठी आणि शहरवासीयांसाठी त्यांच्या नेत्यांना शहराची वाट दिसली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांना शहरात बोलावून दिखावा करण्याचा प्रयत्न सत्ताधा-यांचा सुरू आहे. मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते पुणे शहरात येणार असल्याने त्यांना शहरात बोलावून कामांचे उद्घाटन करून श्रेय लाटण्याची तयारी सुरू आहे. परंतु, महानगरपालिकेचे प्रशासकीय कार्यक्रमाचे नियोजन करत असताना राजशिष्टाचाराचे पालन होणे आवश्यक आहे. सत्तेच्या मस्तीमध्ये आकंठ बुडालेल्या भाजपच्या पदाधिका-यांना त्याचे भान राहिलेले नाही.
या पूर्वी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या दबावाखाली प्रशासनाने राजशिष्टाचाराचे पालन न केल्याचे प्रकार घडले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने वारंवार भूमिका मांडून निषेध केला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यक्रमासाठी राजशिष्टाचाराचे पालन करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना निमंत्रित करावे. सन्मानीय पालकमंत्री महोदयांचा अनादर होणार नाही. याची खबरदारी महापालिका प्रशासन व आयुक्त राजेश पाटील यांनी घ्यावी. तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा या कार्यक्रमाला विरोध करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
भाजपने अपयश झाकण्याचा खटाटोप थांबवावा
सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाकडून उद्घाटन कार्यक्रमात नियोजित प्रकल्पांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताकाळात सुरू झालेल्या प्रकल्पाचा देखील समावेश आहे. आमचे नेते अजितदादा यांच्या नेतृत्त्वाखाली नियोजन झालेल्या कुस्ती प्रशिक्षण केंद्र, बर्ड व्हॅली लेझर शोसारखे प्रकल्प आहेत. यावरून भाजपला पाच वर्षात पिंपरी चिंचवड शहरासाठी काही करता आलेले नाही. हे त्यांचे अपयश देखील स्पष्ट होते. भोसरी येथील कृस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन आदरणीय श्री. शरद पवार साहेब व अजितदादा यांच्या हस्ते झाले होते. याचे भाजपचे आमदार, पदाधिकारी साक्षीदार आहेत. त्यामुळे याचे भान ठेवावे. आपले अपयश झाकण्याचा खटाटोप करू नये, असा टोला देखील संजोग वाघेरे पाटील यांनी लगावला आहे.