#ElectionsResults।राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ‘ओव्हर कॉन्फिडन्स’मुळे भोसरीमध्येसुद्धा मोठी पिछेहाट!
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का
![#ElectionsResults. Big setback even in Bhosari due to 'over confidence' of nationalist Ajit Pawar group!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Ajit-Pawar-1-1-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. महायुतीच्या माध्यमातून अजित पवार यांनी एकूण ५ जागा लढवल्या. त्यापैकी रायगड वगळता सर्व जागांवर पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, अत्यंत प्रतिष्ठेच्या बारामती व शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा झालेला पराभव आत्मचिंतन करायला लावणारा आहे.
भाजपा-शिवसेना (शिंदे गट)- राष्ट्रवादी (अजित पवार गट)- रासप- आरपीआय व मित्र पक्षांच्या महायुतीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला ‘घड्याळ’ चिन्हावर रायगड, बारामती, शिरुर, धाराशीव आणि परभणी (रासप) अशा ५ जागा मिळाल्या होत्या. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शिरुरमधून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात होते. या दोन्ही जागा जिंकण्यासाठी पवार यांनी मोठी मेहनत घेतली होती. मात्र, स्थानिक पातळीवर साथ न मिळाल्यामुळे अजित पवार गटाला मोठा फटका बसला आहे.
अजित पवार आणि सहकाऱ्यांनी पक्ष व चिन्ह ताब्यात घेतले. भाजपासोबत महायुतीमध्ये सत्तेत सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपासोबत सत्तेत असल्याचा फायदा होईल. महायुतीच्या ताकदीने राष्ट्रवादीच्या ५ पैकी किमान ४ जागा निश्चितपणे निवडून येतील, असा ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना राहिला. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची मोठी पिछेहाट झाली, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या माध्यमातून १ लाख मताधिक्य मिळेल, असा दावा भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात सुमारे १० हजार मतांचे लीड भोसरीतून आढळराव पाटलांच्या खात्यावर आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मतदानाच्या शेवटच्या दिवशी ‘तुतारी’ चालवा, असा ‘मॅसेज’ बूथ यंत्रणेपर्यंत दिल्यामुळे आढळराव पाटील यांचा मोठा फटका बसला.
शिरुरमध्ये प्रचाराचे नियोजन ‘सपशेल फेल…’
शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बूथ यंत्रणा ‘सपशेल फेल’ ठरली. प्रचार यंत्रणेमध्ये एकवाक्यता नव्हती. निवडणुकीतील मतदार स्लीप वाटप झाले नाही. तसेच, प्रचाराचे साहित्य प्रभावीपणे घरोघरी पोहोचले नाही. यासह आढळराव पाटील यांना ‘घड्याळ’ चिन्ह शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवता आले नाही. राज्यातील राजकीय संभ्रमावस्थेमुळे स्थानिक आजी-माजी पदाधिकारी ‘ॲक्टिव्ह’ करण्यात राष्ट्रवादीचे नेते अपयशी ठरले. यासह हक्काचा मतदार बाहेर काढून मतदान करण्यात यश मिळाले नाही. त्याचा फायदा महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे यांना झाला.