रमजान ईद उत्साहात; ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांकडून सामुहिक नमाज पठण

देहूरोड : परिसरात मुस्लिम बांधवांच्या पवित्र महिन्यातील रमजान ईद निमित्त विविध पक्ष, सामाजिक संघटना, प्रतिष्ठाण, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मुस्लीम बांधवांच्या ऐकमेकांच्या गळाभेटी आणि शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात सोमवारी (दि.३१) रमजान ईद साजरी केली.
देशभरात मुस्लिम बांधवांकडून पवित्र महिन्यातील रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रमजान ईद निमित्त महिनाभर खडतर रोजा (उपवास) केल्यानंतर सोमवारी मुस्लीम बांधवांनी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी केली. या महिन्यात दानधर्म करणे पवित्र मानले जाते. ईदच्या दिवशी रोजाची उपवासाने सांगता होते.
देहुरोड शहरातील इदगाह मैदानामध्ये सामुहिक नमाजाचे पठण करण्यात आले. यासाठी मुस्लीम बांधवानी अत्तर लावत नवीन कपडे घालून नमाज पठण करण्यासाठी सकाळी मैदानावर तसेच मस्जीदीमध्ये गर्दी केली होती. जगाला शांततेचा संदेश देणारा हा सण मुस्लीम बांधवा बरोबरच इतर सर्व धर्मियांनीही उत्साहात साजरा केला.
हेही वाचा – ‘माझं राजकारण संपलं तरी पवारांपुढे कधीच झुकणार नाही’; जयकुमार गोरे यांचं विधान
रविवारी सायंकाळी चंद्रदर्शनानंतर परीसरातील सर्व मस्जिदी मधून सोमवारी ईद साजरी करण्याचे फर्मान देण्यात आले आणि ईदच्या तयारीला वेग आला होता. ईदच्या सणा निमित्त रात्री उशीरा पर्यंत शहरातील बाजारपेठा सुरू होत्या. सकाळपासून मुस्लीम बांधव सामुदायिक नमाजसाठी बाहेर पडत होते. सकाळी नऊ वाजता पंचक्रोशीतील परीसरातुन सामुदायिक नमाज पठणासाठी हजारो मुस्लीम बांधव इदगाह मैदानावर हजर झाले होते.
मुस्लिम बांधवांनी मौलाना अरबाज गोलंदाज यांच्या मागे सामुदाईक नमाजचे पठण केले. परिसरातील ठिकठिकाणी असणाऱ्या मज्जिद मध्येही साडेनऊच्या सुमारास नमाज पठण झाले. त्यानंतर परिसरातील सर्वधर्मिय उपस्थित बांधवांनी मुस्लीम बांधवाना ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांच्या गळाभेटी झाल्या. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या व्यक्तींना पाहूणचार म्हणून ईदचा खास मेनू शीरखुर्मा दिला जातो. गोडधोड पदार्था बरोबर बिर्याणी,पुलावचा आस्वाद देखील मुसलम बांधून दिला जातो.
अनुचित प्रकार घडू नये यासाठी ईदगाह मैदानावर मोठया प्रमाणात पोलीस बेदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक विभागाच्या पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, देहूरोड विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक महेंद्र कदम, एलआयबीचे प्रशांत वाबळे, मयूर घागरे यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.