पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान वृद्ध महिलेचे सव्वा लाखाचे दागिने लंपास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/download.jpeg)
पिंपरी | प्रतिनिधी
निगडी ते लोणावळा या मार्गावर पीएमपीएमएल बसने प्रवास करताना एका वृद्ध महिलेचे एक लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना 26 एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन ते दोन वाजताच्या कालावधीत जिजामाता चौक ते तळेगाव स्टेशन या दरम्यान घडली.
सुरेखा उमाकांत पवार (वय 62, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पवार या 26 एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजता जिजामाता चौक येथून निगडी-लोणावळा या पीएमपीएमएल बसमध्ये बसल्या. त्या दुपारी दोन वाजता तळेगाव स्टेशन येथे उतरल्या. या प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील अडीच तोळ्याची एक लाख 20 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.