Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जुन्या रागातून चालकानेच पेटविले वाहन

हिंजवडीतील घटनेला धक्कादायक वळण

 ज्यांच्यावर राग ते वाचले, निष्पाप चार जणांचा बळी

पिंपरी :  हिंजवडी येथे व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाला आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. या वाहनावरील चालकाने कर्मचाऱ्यांबरोबरील वाद आणि पगार वाढ न झाल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. चालकाने आपणच हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे.

जनार्दन हंबर्डीकर (वय ५६, रा. कोथरूड) असे आरोपी चालकाचे नाव आहे. हिंजवडीतील व्योम ग्राफिक कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरवर तो चालक म्हणून काम करतो. बुधवारी सकाळी सकाळी साडेआठ वाजता हिंजवडी येथिल विप्रो सर्कल फेज एकच्या परिसरात अचानक या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. तर, सहा कामागार गंभिररीत्या भाजले. तसेच चार कर्मचाऱ्यांनी गाडीतून उड्या घेत आपला जीव वाचविला. प्रथमदर्शनी वाहनात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच जुन्या खुन्नसमधून आणि कंपनी प्रशासनाच्या नाराजीतून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.

पूर्वनियोजित कट

चालक जनार्दन हंबर्डीकर याचे काही कर्मचाऱ्यांशी वाद होते. तसेच दिवाळीत कंपनीने त्याचा पगारही कापला होता. याची खुन्नस आरोपी हंबर्डीकर याच्या डोक्यात होती. त्याने व्योम ग्राफिक्स या आपल्या कंपनीतूनच मंगळवारी (१८ मार्च) एक लिटर बेंजिम सोल्युशन नावाचे केमिकल एक प्लास्टिकच्या बाटलीत भरून गाडीत आणून ठेवले. तसेच कापडाच्या चिंध्या सीट खाली ठेवल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (१९ मार्च) सकाळी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी गेले असता वारजे येथे एक आगपेटी विकत घेतली. कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना हिंजवडी फेज वन परिसरात गाडी येताच आरोपीने गाडीचा ब्रेक दाबला. आगपेटीची काडी पेटवून कापडाच्या चिंध्यांना आग लावली. केमिकलमुळे काही वेळातच आगीचा भडका उडाला. चालकाने तातडीने गाडीतून बाहेर उडी मारली. त्यानंतर पुढील दुर्घटना घडली.

हेही वाचा –  श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील तुकोबारायांचे पहिले मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर

आरोपीच्या बोलण्यातील उडवाउडवीमुळे घटनेचा उलगडा

आरोपी चालक हंबर्डीकर याला भाजून झालेल्या जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यात तफावत दिसत होती. किरकोळ जखमी होऊनही तो वारंवार शुद्ध हरपल्याचे नाटक करत होता, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या लक्षात आले. पोलिसांच्या चौकशीतही तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. तसचे घटनास्थळाजवळील एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये चालक गाडीच्या सीट खाली काहीतरी पेटवत असल्याचे पुसटसे दिसून आले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

अपमानास्पद वागणूक….

आरोपी चालक हंबर्डीकर याला कंपनीतील इतर कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत होते. त्याला दोन दिवसापूर्वी डब्यातील चपातीही खाऊन दिली नाही. तसेच दिवाळीत त्याचा पगार कापला होता. हा सर्व राग आणि खुन्नस डोक्यात असल्याने ही कृती केल्याचे आरोपीने कबूल केले आहे.

निष्पाप लोकांचा बळी गेला

गाडीत बसलेल्या तीन लोकांवर आरोपी चालकाचा राग होता. त्यांना इजा पोहचविण्यासाठी त्याने हा प्रकार केला. त्याला कंपनीच्या जवळ किंवा कंपनीच्या परिसरात गाडी पेटवायची होती. मात्र, गाडी थांबवून, आग लावून पळता येईल अशी जागा पाहून त्याने आग लावली. मात्र, ज्या तिघांवर राग होता, ते तीन कर्मचारी सुखरूप वाचले आहेत. तर, ज्यांचा या सर्व गोष्टीशी एवढा संबंध नव्हता असे चार लोक या घटनेत होरपळून मृत्यू पावले आहेत. शंकर कोंडीबा शिंदे (वय ६३, रा. सिद्धीविनायक आंगण सोसायटी, नऱ्हे), गुरुदास खंडू लोखरे (वय ४५, रा. हनुमाननगर, कोथरूड), सुभाष सुरेश भोसले (वय ४४, रा. त्रीलोक सोसायटी, वारजे), आणि राजन सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर, जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रविण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे या घटनेत भाजले असून त्यांनी उपचारासाठी हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. तर, विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदिप राऊत हे कर्मचारी सुरक्षीतपणे ट्रॅव्हलच्या बाहेर पडले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

हिंजवडीत कंपनीच्या गाडीला आग लागून चार लोकांचा मृत्यू झाला. ही आग चालकाने लावल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चालकावर उपचार सुरू आहेत. तसेच हिंजवडी पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

– विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button