डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अवघ्या विश्वाला प्रेरणादायी : नगरसेवक डॉ. सुहास कांबळे
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

महापौर रवी लांडगे यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांनी केले अभिवादन
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी सामूहिक अभिवादन व सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हे तर त्यांनी अवघ्या जगाला समतेचा, आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा संदेश दिला, जो अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.. असा विश्वास शहर सुधारणा समिती सदस्य तथा विद्यमान नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी यनिमित्ताने व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन तसेच पिंपरी चौक येथील भिमसृष्टी याठिकाणी आयोजित मुख्य अभिवादन कार्यक्रमात महापौर रवी लांडगे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, तसेच सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी यांच्या समवेत नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी महामानवांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

हेही वाचा : प्रियदर्शनी स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
यावेळी सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आलेल्या भीम अनुयायी व नागरिकांसाठी विविध सेवाभावी संस्था व संघटनांच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांना भेट देण्यात आली. मोफत पाणी वाटप, सरबत वाटप, आरोग्य तपासणी शिबीर आदी स्टॉलचे उद्घाटन डॉ. सुहास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वही–पेन संकलन समितीच्या अभिनव उपक्रमात सहभागी होत विद्यार्थ्यांसाठी वह्या व पेन भेट देण्यात आले.
विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना उपस्थिती
प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर येथे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य भीमजयंती मिरवणुकीत डॉ. सुहास कांबळे सहभागी झाले. त्यानंतर भिमरत्न प्रतिष्ठान व तथागत बुद्धविहार येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजक व कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच खंडेवस्ती येथील धम्मचक्र प्रवर्तन बुद्धविहार, इंद्रायणीनगर येथील धम्मनिनाद बुद्धविहार आणि मोशी प्राधिकरण धम्मदीप संघ येथे पंचशील ध्वजारोहण करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. या सर्व ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत डॉ. सुहास कांबळे यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समता, न्याय व बंधुतेचे विचार आजच्या काळात सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, येत्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सर्वसमावेशक देश घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. या निमित्ताने सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतो.
– डॉ. सुहास कांबळे, सदस्य शहर सुधारणा समिती, विद्यमान नगरसेवक पिं. चिं. मनपा.





