शहराच्या अस्मितेविषयी बोलू नका, आपली चूक मान्य करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने विरोध
महापालिका आयुक्तांना शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांचा इशारा

पिंपरी- चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात विकासाचे चांगले काम करण्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी ठेवावी. चांगल्या कामाला आमचा पाठिंबा आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेला, अस्मितेविषयी कोण बोलत असेल तर तेवढ्याच आक्रमकपणे शिवसेना म्हणून विरोध केला जाईल, असा इशारा महापालिकेतील शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी दिला आहे. आपण चुकला आहात हे आयुक्तांनी मान्य करावे, असेही ते म्हणाले.
गटनेते विश्वजित बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली अन् चापेकर बंधूंसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या नगरीला लाभला आहे. औद्योगिक, कामगारनगरी म्हणून हे शहर उदयाला आले. सर्वात वेगाने विकसित आणि लोकसंख्या वाढणारे शहर निर्माण झाले आहे. या शहराची नगरपालिका कै. अण्णासाहेब मगर यांनी केली. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून परिचित होती. यामुळे भारतवासीयांना या शहराची ओळख आहे.
हेही वाचा : पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाई पूर्ण करा; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कदाचित आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना हे माहिती नसेल. आयटी हब म्हणून जगाच्या नकाशावर शहराचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. या शहराला अनेक राजकीय नेत्यांचा वारसा लाभला आहे. कै. यशवंतराव चव्हाण, कै. अण्णासाहेब मगर, कै. प्रा.रामकृष्ण मोरे, कै. अजित पवार, जेष्ठ नेते शरद पवार या सर्वांनी शहराचे नेतृत्व केले आहे. शासकीय नोकरी करीत असताना आयुक्तांनी शहराचा परिचय ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





