पिंपरीत विस्कळीत पाणीपुरवठा!
राष्ट्रवादीचे नगरसेवक डब्बू आसवाणी आक्रमक : आंदोलनाचा दिला इशारा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी परिसरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्येवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवानी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज, शनिवार दि.३१ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा अल्टिमेटम प्रशासनाला दिला आहे.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून सी ब्लॉक, पीडब्लूडी (PWD), शास्त्री नगर आणि सुभाष नगर या भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. रोजच्या गरजांसाठी पाण्यासाठी नागरिकांना झगडावे लागत असून, अनेक ठिकाणी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा : दिवंगत अजित पवारांनी माध्यमांचे स्वातंत्र्य जपले!
या संदर्भात प्रशासनाकडून केवळ तांत्रिक कारणे पुढे केली जात असल्याने संताप व्यक्त करत नगरसेवक आसवानी यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. “नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा त्यांनी बैठकीत दिला.
प्रशासनाला अल्टिमेटम…
जर दिलेल्या मुदतीत पाणीपुरवठ्याची परिस्थिती सुधारली नाही, तर प्रशासनाविरोधात ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येईल, असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरून लढा देण्यास आपण तयार असल्याचेही आसवानी यांनी स्पष्ट केले आहे. डब्बू आसवानी यांच्या भूमिकेमुळे पिंपरीतील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाची पुढील पावले काय असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




