दिंडी अपघात: उपचारादरम्यान आणखी 2 महिलांचा मृत्यू; एकूण मृतांचा आकडा 4 वर
![Dindi accident: 2 more women die during treatment; Total death toll at 4](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/1637986699468-1-e1637986909725-1.jpg)
पिंपरी चिंचवड | जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मावळ तालुक्यातील साते गावाजवळ आज पहाटे सव्वासहाच्या सुमारास आळंदीकडे पायी जाणार्या दिंडीमध्ये भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो घुसल्याने भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 24 वारकरी जखमी झाले असून 2 वारकरी महिला दगावल्या आहेत तर उपचारादरम्यान आणखी २ महिल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वडगाव मावळ पोलिसांनी दिली आहे. तर टेम्पो चालक राजीव चौधरी (रा. वाघोली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.सविता वाळकू येरम (वय 55 उंबरे, ता. खालापूर जि. रायगड), जयश्री आत्माराम पवार (वय 55 रा.भूतीवली ता कर्जत जि. रायगड), विमल सुरेश चोरघे(वय 50,रा.बीड खुर्द), संगीता वसंत शिंदे(वय 56, रा.कर्जत) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत . आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी माउली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, उंबरे (ता. खालापूर) येथील तब्बल 200 वारकरी पायी आळंदीच्या दिशेने चालले होते. नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात काल रात्री मुक्काम होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखीने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दिंडी सारे फाट्याजवळ अतिथी हॉटेलसमोर आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेला पिकअप टेम्पो या पायी चालणाऱ्या वारीमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला.
यामध्ये 26 वारकरी जखमी तर 2 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. तर उपचारादरम्यान आणखी 2 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एकूण २४ जखमींवर आता उपचार सुरु आहेत. तसेच जखमींपैकी 14 जणांवर कामशेत येथील डॉ. विकेश मुथा यांच्या महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सहा रुग्णांना कामशेतच्या बढे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल आणि कान्हे येथील ग्रामीण शासकीय रुग्णालयांत काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिली. घटनास्थळी जखमी वारकऱ्यांच्या चपलांचा खच पडला होता. आळंदी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.