राज्यभरातील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा निर्धार!
शशिकांत झिंजुर्डे: कामगार संघटनांचा राज्यव्यापी मेळावा पिंपरीत उत्साहात

पिंपरी-चिंचवड | महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील कामगार-कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांचा एकत्रित राज्यव्यापी मेळावा पिंपरी-चिंचवड येथे पार पडला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात आयोजित या मेळाव्याला राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कामगार नेत्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.
या मेळाव्याचे उद्घाटन फेडरेशनचे प्रवक्ते श्री. गौतम खरात यांनी केले. मेळाव्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. राज्यातील बृहन्मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, लातूर, धुळे, जळगाव, परभणी, इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, सांगली-मिरज-कुपवाड आदी २५ पेक्षा अधिक शहरांतील कामगार प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
या मेळाव्यात प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली: 1. काही महानगरपालिकांमध्ये ३ ते ४ महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. 2. जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी. 3. मनपा क्षेत्रातील वाढते कंत्राटीकरण आणि त्यावरील चिंता. 4. कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत समाविष्ट करणे. 5. नर्सिंग कौन्सिल आणि सलीम मर्चंट पुरस्कारानुसार रुग्णालयातील कर्मचारी व रुग्ण यांचे प्रमाण निश्चित करणे. 6. सर्व महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी दर्जेदार वैद्यकीय सेवा लागू करणे.
हेही वाचा : क्रांतीकारक व सैनिकांविषयी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मेळाव्याच्या समारोपात सर्व उपस्थित कामगार नेत्यांनी एकमुखी ठराव करून या मागण्यांसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानुसार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी थेरगाव येथील स्व. शंकर (आण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे दुसऱ्या राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे श्री. झिंजुर्डे यांनी स्पष्ट केले.
या वेळी उपस्थित प्रमुख नेत्यांमध्ये शशांक राव, रमाकांत बने, अशोक जाधव, वामन कविस्कर (बृहन्मुंबई), मोहन तिवारी, चेतन आंबोणकर, वीरपाल भाल (ठाणे), उदय भट, मधुकर राकेश विटकर (पुणे), जगदीश देशमुख (नाशिक), अॅड. स्वप्निल काशीद (नवी मुंबई), गणेश शिंगे (नांदेड), केशव आंधळे (परभणी), दिलीप शिंदे (सांगली), प्रल्हाद कोतवाल (अमरावती), विकास लगारे (इचलकरंजी), दिनकर आवाळे, अजित तिवले (कोल्हापूर), सतिश चंडालिया, अनिल कांबळे (पनवेल), दीपक राव (भिवंडी), बापूसाहेब सदाफुले (सोलापुर), अंकुश गायकवाड (लातूर), प्रविण तंतरपाळे (नागपूर), रमेश जगताप (मालेगाव) यांचा समावेश होता. मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री. गौतम खरात यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. मोहन तिवारी यांनी केले.
राज्यभरातील महानगरपालिका कामगार व कर्मचाऱ्यांचे प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. आम्ही शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, परंतु आता संयमाची परिसीमा झाली आहे. येत्या २४ ऑगस्टच्या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवून, या मागण्यांसाठी निर्णायक लढा उभारण्याचा आमचा निर्धार आहे.
– शशिकांत ऊर्फ बबनराव झिंजुर्डे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशन.





