उपायुक्तांचा जनता दरबार सुरू; पहिल्या दिवशी 23 तक्रारींचे निराकरण
![Deputy Commissioner's Janata Darbar begins; Resolved 23 complaints on the first day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Wakad-Police-Station-1.jpg)
पिंपरी चिंचवड | नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, यासाठी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सोमवारी (दि. 9) वाकड पोलीस ठाण्यात जनता दरबार घेतला. या दरबाराच्या पहिल्याच दिवशी 23 अर्जदारांच्या तक्रारींचे निरासन करण्यात आल्याची माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली.
नागरिकांनी केलेल्या तक्रारीबाबत पोलिसांनी काय कार्यवाही केली यासाठी नागरिकांना पोलीस आयुक्तालयात जावे लागते. मात्र स्थानिक पातळीवरच समस्येचे निराकरण झाल्यास पोलीस आयुक्तालयात जाणाऱ्यांची संख्या कमी होईल. यामुळेच पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात जनता दरबार घेण्यास पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सुरुवात केली आहे.
वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 9) जनता दरबार घेण्यात आला. यावेळी 23 नागरिकांच्या तक्रार अर्जाचे निराकरण करण्यात आले. तसेच आगामी काळात परिमंडळ दोन मधील इतर पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे जनता दरबार घेण्यात येणार आहे.
प्रत्येक पोलीस ठाण्याला ठराविक वार नेमून देण्यात आला आहे. संबंधित दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजताच्या कालावधीत पोलीस उपआयुक्त जनता दरबार घेतील. अनेक नागरिक त्यांच्या तक्रारींचे पोलीस ठाणे स्तरावर निरसन न झाल्यास थेट पोलीस उपायुक्त कार्यालयात जातात. अशा नागरिकांच्या तक्रारींचे निरसन पोलीस ठाणे स्तरावर तिथेच केले जावे, यासाठी हा जनता दरबार घेण्यात येत आहे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे निरसन पोलीस ठाण्यात न झाल्यास जनता दरबारात आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.
या दिवशी या पोलीस ठाण्यात होणार जनता दरबार –
सोमवार – सांगवी पोलीस स्टेशन
मंगळवार – तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व शिरगाव पोलीस चौकी यांचा दरबारात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे होईल.
बुधवार – देहूरोड पोलीस स्टेशन, रावेत पोलीस चौकी यांचा दरबार देहूरोड पोलीस स्टेशन येथे होईल.
गुरुवार – चिखली पोलीस स्टेशन
शुक्रवार – हिंजवडी पोलीस स्टेशन
शनिवार – वाकड पोलीस स्टेशन