नातीसोबत लग्न करण्याची मागणी घालत आजीवर कोयत्याने वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/crime-2-2.jpg)
पिंपरी चिंचवड | लग्न झालेली नात तिच्या नव-याशी पटत नसल्याने आजीच्या घरी आली असता एका ति-हाईत व्यक्तीने आजीच्या घरी जाऊन तिच्या विवाहित नातीसोबत लग्न लावून देण्याची मागणी केली. त्यातून आजीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 11) रात्री अकरा वाजता शांतीनगर, भोसरी येथे घडली.किशोर शिंदे (रा. बोबगाव, पिसाळवाडी, सासवड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातीचे सुनील महादेव मोरे (रा. बोबगाव, पिसाळवाडी, सासवड) यांच्यासोबत लग्न झाले आहे. मात्र नव-यासोबत तिचे पटत नसल्याने ती मागील तीन महिन्यांपासून फिर्यादी आजीच्या घरी राहत आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता आरोपी किशोर शिंदे फिर्यादी यांच्या घरी आला.
दरम्यान, ‘तुमची नात कुठे आहे. मला तिला भेटायचे आहे. तुम्ही माझे तिच्याशी लग्न लावून द्या’ अशी मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी नकार दिला. त्यावरून आरोपीने फिर्यादी यांना, त्यांच्या भावाला व मामाला मारून टाकण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.