आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे : शहरात गल्लोगल्ली भाजपाचे कमळ चिन्ह अद्यापही कायम
![Demand action against officers and employees guilty of violating the code of conduct](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Pimpri-Chinchwad-3-780x470.jpg)
पिंपरी | गल्लोगल्ली कमळ चिन्ह लावून निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करूनही संबंधितांवर कारवाई करण्यात अधिकारी,कर्मचारी कसूर करत आहेत.भाजपा पदाधिकाऱ्यांच्या चुकांना खतपाणी घालणाऱ्या दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केली. तसेच कमळ चिन्ह लावणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावे, अशी मागणी काळे यांनी पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सतीश काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करणे सर्वांना अनिवार्य आहे. मात्र त्याचे भान भाजपच्या पदाधिकाऱ्यांना नाही. पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षाचे चिन्ह आणि नावाचा खुलेआम वापर करताना दिसत आहेत. वास्तविक पाहता संबंधित निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पक्षांचे चिन्ह, लोगो हटविण्याची कार्यवाही पार पाडणे आवश्यक आहे. मात्र निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत की काय असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातील सामान्य जनतेला पडत आहे.भाजपाचे चिन्ह असलेले कमळ शहराच्या गल्लोगल्ली उघडपणे दिसत आहे. सार्वजनिक भिंती, पोस्टरवर हे चिन्ह दिसत आहे. त्याच्यावर अद्याप कारवाई होताना दिसत नाही.
हेही वाचा – ‘काँग्रेसने दिल्लीवर लक्ष ठेवावे, गल्लीतल्या राजकारणात पडू नये’; संजय राऊतांचा सल्ला
या बाबत कमळ चिन्हाचे फोटोसह निवेदन देऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने इशारा देण्यात आला होता. त्यांनतर काही काळ कारवाईचा दिखावा करण्यात आला. मात्र शहरातील संपूर्ण भाजपचे चिन्ह हटविण्याकडे अधिकारी कानाडोळा करत आहेत. पुन्हा शहरात भाजपाने राजरोसपणे आपल्या चिन्हाचा वापर सुरु केला आहे. निवडणूक आयोग देखील याची गांभीर्याने दखल घेत नाहीत. आचारसंहितेच्या नियमांना फाट्यावर मारणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच या प्रकरणाकडे गंभीरपणे न बघणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी केली.
संबंधित पक्षाचे आमदार आणि इतर पदाधिकारी यांच्यावर गुन्हे नोंदवा : सतीश काळे
ज्या भागात भाजपाचे कमळ चिन्ह उघडपणे लावलेले आहे. त्या विधानसभेचे आमदार, विधानसभा अध्यक्ष आदींवर जबाबदारी निश्चित करावी. आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत,अशी देखील मागणी सतीश काळे यांनी केली.