‘रोड स्विपिंग मशीन’ची कार्यवाही तात्काळ सुरू करा!
भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांची मागणी
![Deepak Modhave Patil said that the operation of road sweeping machine should be started immediately](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/WhatsApp-Image-2023-11-09-at-17.17.14-780x470.jpeg)
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांची सफाई करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने कामकाज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘रोड स्विपिंग मशीन’ खरेदी केल्या आहेत. मात्र, या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी आणि शहर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ‘स्वच्छ सर्व्हेक्षण’मध्ये अग्रेसर राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीचे रस्ते अत्याधुनिक ‘रोड स्वीपर मशीन’द्वारे साफ करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रशासनाने कामाला मंजुरीही दिली आहे. मात्र, अद्याप यंत्राद्वारे सफाईचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे ‘स्वच्छ’ सर्व्हेक्षणातील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मोशी हॉस्पिटलला प्रशासकांची मंजुरी
वास्तविक, दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी स्थायी समितीने यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईच्या कामाला मंजुरी दिली आहे. मात्र, अद्याप काम सुरू करण्यात आलेले नाही. विदेशी कंपन्यांकडून संबंधित ठेकेदार कंपनीने वाहने खेरीदी केल्याची माहिती आहे. एकूण १६ रोड स्वीपर मशीन आहेत. या वाहनांची पिंपरी-चिंचवउ उपप्रादेशिक कार्यालयाकडे नोंदणी प्रक्रिया करावी लागणार आहे. आतापर्यंत केवळ ६ वाहनांना परवाना मिळाला असून, उर्वरित १० वाहनांची नोंदणी अपूर्ण आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व चार भागातील कामासाठी प्रत्येक महिन्याला तब्बल ४५ कोटी रुपयांचा खर्च प्रशासन करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ संबंधित वाहनांचा सेवेत रुजू करावे, अशी आग्रही मागणीही दीपक मोढवे- यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात असून, रस्ते स्वच्छतेसाठी आरोग्य विभागावर ताण येतो. वाढते प्रदूषण आणि वाहनचालकांना होणारा मन:स्ताप यावर उपाययोजना म्हणून यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई सोयीची असून, प्रशासनाने वाहनांची नोंदणी करुन कामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा आहे.
दीपक मोढवे-पाटील, शहराध्यक्ष, भाजपा वाहतूक आघाडी, पिंपरी-चिंचवड.