शहरातील मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारावी!
भाजपा वाहतूक आघाडी शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांची मागणी
![Deepak Modhave Patil said that Goshala should be set up for stray animals in the city](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Deepak-Modhave-Patil-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा भर रस्त्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी या जनावरांनी ठिय्या मांडल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच, राज्यात सध्या लम्पी आजाराने जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांसाठी गोशाळा उभारावी. ज्यामुळे त्यांचे उपचार आणि देखभाल करणे सोईचे होईल, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे पाटील यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरासह देशभरात भटक्या गुरांची समस्या आहे. देशात मा. श्री. नरेंद्रजी मोदी सरकारच्या काळामध्ये गोवंश संवर्धनासाठी पुढाकार घेण्यात आला. राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने गोवंश संवर्धन कायदा मंजूर करण्यात आला. असे असताना शहरातील मोकाट जनावरे आजही निराधार आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा – आधी १४ वर्षे वनवास मग घडले प्रभू श्रीराम; हेच जीवनाचे सार!
शहरात सध्या गणेशोत्सवामुळे बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी आहे. मात्र, काही ठिकाणी मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. तसेच, या जनावरांच्या देखभालीची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
परिणामी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोकळ्या जागेत मोकाट जनावरांसाठी गोशाळा विकसित करावी. त्या ठिकाणी या सर्व जनावरांना मुक्त गोठा करुन ठेवण्यात यावे. सदर गोशाळा व्यवस्थापनाचे काम प्राणी प्रेमी किंवा गोवंश संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेला द्यावे. ज्यामुळे शहरातील नागरिक सढळहस्ते मदतही करतील आणि जनावरांचे संगोपनही चांगले होईल. महापालिका प्रशासनाने मोकाट जनावरांची समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.