पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना संसर्ग कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी घट
![नेदरलँड, चिलीसारख्या देशांपेक्षाही मराठवाडय़ातील प्राणवायू क्षमता अधिक](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/607dbfb5d36a4_oxygen.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
शहरातील महापालिका रुग्णालयांना एप्रिल मध्ये दिवसाला जळपास ५० टन ऑक्सिजन लागत होते. आता मे च्या शेवटच्या आठवड्यात २५ टन ऑक्सिजन लागत आहे. त्यामुळे एप्रिलच्या तुलनेत आता निम्याने ऑक्सिजनची मागणी घटली आहे. शहरातील कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत आहे. परिणामी रुग्णालयातील दाखल रुग्णांची संख्या कमी होत आहे. ऑक्सिजन बचतीसाठी केलेले नियोजन आणि कमी झालेली रुग्ण संख्या यामुळे ऑक्सिजनची मागणी घटली आहे.
दुसरी लाट सुरू झाली तेव्हा ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जम्बो कोविड सेंटरशी करारनामा नव्हता. वायसीएम रुग्णालयाशी करारनामा होता. त्यामुळे सुरुवातीला ऑक्सिजन पुरवठा करण्यास अडचणी आल्या होत्या.
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारी पासून वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मार्च मध्ये रुग्ण वाढीने उच्चांक गाठला. एप्रिल मध्ये रुग्ण वाढ सुरूच राहिली परिणामी ऑक्सिजनची मागणी वाढली. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी वाढल्याने सर्वत्र तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजनचा वापर काळीपूर्वक करा, ऑक्सिजनचे ऑडिट करा अशा सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. ऑक्सिजनची बचत करण्याचे नियोजन महापालिका प्रशासन आणि रुग्णालयानी केले.
रुग्ण संख्या कमी झाल्याने आणि ऑक्सिजनच्या बचतीमुळे ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. दुसरी लाट आता ओसर आहे. परंतु पुढील काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर त्यासाठी उपाययोजना करा अशा सूचना राज्य आणि केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर विकत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या रुग्णालयाला किती ऑक्सिजनचा साठा करता येऊ शकतो. याची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापालिका उपायुक्त स्मिता झगडे यांनी दिली.