प्रतिमहा दहा लाख नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दीष्ट, आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/पालिका-1.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
देशभरात 1 मे पासून 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. महिनाभरात 10 लाख लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
लसीकरणसंदर्भात आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. यावेळी आयुक्त राजेश पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर हिराबाई घुले, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक अभिषेक बारणे आदी उपस्थित होते.
शहरात 45 वर्षांपुढील सुमारे तीन लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आगामी काळात कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शहरातील संपूर्ण नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येणार असुन पुढील महिन्याभराच्या कालावधीत सुमारे १० लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आखले आहे. यासाठी शहरात सुरु असलेल्या लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त प्रभागनिहाय प्रत्येकी चार असे आणखीन ६० अतिरिक्त केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.
नागरिकांना ने-आण करण्यासाठी रिक्षा वाहतुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. नगरसेवक व प्रशासन प्रतिनिधी यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असुन प्रतिकेंद्र २०० लोकांची नोंदणी करुन लसीकरण करण्यात येणार आहे. सद्या शहराला दर दिवसा १८ ते २० हजार लस उपलब्ध होतात. १ मे पासुन ४० ते ५० हजार लस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. लॉकडाऊन काळात या मोहिमेत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये, तसेच लसीकरण ठिकाणी गर्दी होवू नये, सुरळीतपणे लसीकरण व्हावे यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.
या बैठकीमध्ये प्लाझ्मादान, रक्तदान, लसीकरण मोहीम याबाबत जनजागृती, समस्या निराकरण व उपाययोजना, शवदाहिका वाढविणे, ऑक्सिजनसाठी नियंत्रण टीम तयार करणे, शहरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे, वैद्यकीय सेवा पुरविताना लॉकडाऊनचे नियम पाळणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या कामांसंदर्भात प्रशासनाच्या मदतीला नगरसेवकांची टिम असणार आहे. तसेच उपस्थित नगरसेवक पदाधिका-यांनी आवश्यक त्या सुचना आयुक्त यांना केल्या. कोरोना काळात नागरिकांनी सर्वप्रथम स्वत:सह कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर रहावे, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी यावेळी केले.