पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारास कोयत्यासह अटक
पिंपरी चिंचवड | खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार कोयता बाळगताना पिंपरी पोलिसांना आढळला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून कोयता जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) पिंपरी ब्रिजच्या खाली भारतनगर येथे करण्यात आली.अनिस उर्फ सनी फिरोज शेख (वय 20, रा. भारतनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विकास रेड्डी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिस शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. अनिस आणि त्याच्या पाच साथीदारांनी एका तरुणावर खुन्नस मधून कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला होता.
आरोपी अनिस हा रविवारी भारतनगर येथील ब्रिजखाली कोयता घेऊन आला असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला. अनिस कडून कोयता जप्त करत त्याला अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.





