आयपीएल सामन्या दरम्यान विराट कोहलीला पंच देण्यासाठी मैदानात गेलेल्या साता-याच्या तरुणावर गुन्हा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/cricket.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
आयपीएल सामन्या दरम्यान एक चाहता विराट कोहलीला पंच देण्यासाठी थेट मैदानात गेला. कोहलीला पंच देऊन तो रोहित शर्माकडे जाऊ लागला. त्यावेळी चाहत्याला पोलिसांनी पकडले आणि बाहेर काढले. चाहत्याने सरकारी कामत अडथळा निर्माण केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 9) रात्री साडेदहा ते पावणे अकरा वाजताच्या सुमारास गहुंजे स्टेडीयमवर घडला.
दशरथ राजेंद्र जाधव (वय 26, रा. केसुर्डी, ता. खंडाळा, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विनोद साळवे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुणे येथील गहुंजे क्रिकेट स्टेडीयमवर आयपीएलचा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेन्जर्स बेंगलोर या दोन संघांचा सामना होता. दशरथ जाधव हा सामना पाहण्यासाठी आला होता. फिर्यादी पोलीस हवालदार हे स्टेडीयमवर कर्तव्य बजावत होते. दशरथ हा मैदानावरील सुरक्षा तारा ओलांडून मैदानात गेला.
मैदानात जाऊन दशरथ याने विराट कोहलीला पंच दिला. त्यानंतर तो रोहित शर्माला पंच देण्यासाठी धावत जाऊ लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला पकडून मैदानाच्या बाहेर काढले. त्यानंतर दशरथ याने पोलिसांशी वाद घालून सरकारी कामत अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.