कोरोनाची तिसरी लाट ओसरली; नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालय कायमस्वरुपी बंद
![Corona's third wave subsided; Jumbo Hospital at Nehru Nagar permanently closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Pimpri-Jumbo-Covid-Center-1-1.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या तिस-या लाटेत रुग्णसंख्या वाढली. पण, लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी होते. 80 ते 85 टक्के रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे झाले. त्यामुळे तिस-या लाटेत जम्बो रुग्णालयाची आवश्यकता भासली नाही. आता तिसरी लाटही ओसरली आहे. त्यामुळे नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील तात्पुरते उभारलेले जम्बो कोविड रुग्णालय कायमस्वरुपी बंद केले आहे. साहित्य काढण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग 10 मार्च 2020 पासून शहरात सुरू झाला. या दिवशी दाखल झालेल्या तीन रुग्णांवर व त्यानंतर आढळलेल्या रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला होता. मात्र, रुग्णसंख्या वाढू लागल्याने अधिक बेड व ऑक्सिजनची गरज भासू लागली. महापालिकेच्या नवीन भोसरी व पिंपरीतील नवीन जिजामाता रुग्णालयात रुग्णांना दाखल केले.
तरीही बेड कमी पडू लागल्याने जिल्हा प्रशासन, पीएमआरडीए व महापालिकेच्या माध्यमातून नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर खासगी संस्थेच्या माध्यमातून आठशे बेडचे जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन 25 ऑगस्ट 2020 रोजी झाले होते. त्या पाठोपाठ महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे दोनशे बेडचे जम्बो रुग्णालय खासगी संस्थेच्या सहकार्याने सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत कोविडच्या तीन लाटा येऊन गेल्या. दुसरी लाट ओसरल्यानंतर दोन्ही रुग्णालये उपचारासाठी बंद करण्यात आली.
नेहरूनगर जम्बो रुग्णालयाबाबत पीएमआरडीएऐवजी महापालिकेने खासगी संस्थेशी करार करून त्यावरील नियंत्रण स्वतःकडे ठेवले होते. मात्र, त्यात उपचार बंद होते. तीन महिने केवळ भाडे देण्यात आले. डिसेंबर 2021 मध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. त्यामुळे संबंधित संस्थेला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. वायसीएम अन्य रुग्णांसाठी खुले केल्याने कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांवर जम्बोमध्ये उपचार करण्यात आले. तिस-या लाटेत त्याची जास्त आवश्यकता भासली नाही.
आता तिसरी लाटही ओसरली असून रुग्णसंख्या 50 च्या आत आली आहे. याशिवाय महापालिकेचे नवीन जिजामाता, नवीन थेरगाव, नवीन भोसरी, आकुर्डीतील कुटे हॉस्पिटल पूर्ण क्षेमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे एक मार्चपासून नेहरूनगर जम्बो कोविड हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराला रुग्णालयाच्या उभारणीसाठी वापरलेले तंबू व अन्य साहित्य काढून घेण्यास सांगितले आहे.