breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी गणेश मंडळांचे सहकार्य महत्वाचे’; पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे

पिंपरी : यंदाचा गणेशोत्सव शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे मत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे गणेशोत्सव २०२४ नियोजन बैठक व “श्री.मोरया पुरस्कार २०२३” वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे,  पोलीस उप आयुक्त विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त बापू बांगर, पोलीस उप आयुक्त डाॅ. शिवाजी पवार, महापालिकेचे मुख्य महिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त अण्णा बोदडे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार आणि शहरातील विविध गणेश मंडळांचे तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्र आणण्याची संकल्पना लोकमान्य टिळकांनी आणलेली आहे. यंदाचा गणेशोत्सव शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालय कटिबद्ध असून यामध्ये गणेश मंडळांचे सहकार्यही तितकेच महत्वाचे आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित प्रोत्साहनपर गणेशोत्सव स्पर्धेत पुढील वर्षी छोट्या गणेश मंडळांनाही सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि सुरूवातीपासूनच गणेश मंडळांनी केलेल्या विविध उपक्रमांचे परिक्षण करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल जेणेकरून कोणतेच मंडळ स्पर्धेपासून वंचित राहणार नाही. पारंपारिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणपती उत्सव साजरा करावा. गणेशोत्सव दरम्यान स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक असतील तर त्यांना ट्रेनिंग द्यावे. गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केलेल्या परिसरात आग प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच मंडपाजवळ काही अनोळखी, संशयीत, बेवारस वस्तु उदा. सुटकेस, रेडिओ, मोठे घड्याळ, जेवणाचे डबे, सायकली वगैरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती, इसम जवळपास फिरताना रेंगाळताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे. गणेश मूर्तीच्या अंगावर मौल्यवान दागिने असणाऱ्या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष  काळजी घेणे गरजेचे आहे. श्रीं च्या मुर्तींच्या संरक्षणाकरीता मंडळाचे कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी जेणेकरून चोरीच्या घटना टाळण्यास मदत होईल. लेझरच्या वापरामुळे लोकांना डोळ्याचा त्रास होतो डोळे निकामी होतात लेझरचा वापर टाळावा कारण लहान मुले व वयस्कर व्यक्ती यांना सुद्धा इजा पोहोचू शकते. माझे निवेदन आहे की लोकांनी लेझरचा वापर टाळावा तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे येणारे गणेश उत्सव सर्वांनी जोमाने साजरा करावेत. तसेच यंदाचा गणेशोत्सव शांततापुर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी सहकार्य करावे; पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आवाहन केले.

हेही वाचा –  Promising news: पिंपरी-चिंचवडला जलस्वयंपूर्ण बनवण्याची संकल्पपूर्ती!

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले, यावर्षी शहरातील गणेश मंडळांच्या सोयीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून परवाना उपलब्ध करून देण्याची सुविधा देण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही कार्यालयात उपस्थित राहून अर्ज करण्याची गरज पडणार नाही. सर्व गणेश मंडळांनी या प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. याशिवाय सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेच्या जागेवर मंडप किंवा स्टेज व कमानी आदींसाठी परवाना शुल्क माफ करण्यात आले आहे. तसेच शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शालेय स्तरावर पर्यावरणपूरक गणेश मुर्ती निर्मिती व सजावट स्पर्धा आयोजित करणे, नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

सह पोलीस आयुक्त डाॅ. शशिकांत महावरकर म्हणाले की जे उपक्रम राबवतो ते समाज उपयोगी उपक्रम पाहिजे. तसेच त्यामुळे लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे. महिला अत्याचाराबाबत जास्त सजग झाले पाहिजे. समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या उत्सव सणाचे माध्यमातून समाजामध्ये मांडू शकतो. त्यामुळे समाजामध्ये तेढ होणार नाही. तसेच सोशल मीडिया  पोस्ट बाबत खात्री केली पाहिजे ती पोस्ट खरी आहे का खोटी आहे तसेच काही वाटले तर संबंधित पोलीस स्टेशनला कळविले पाहिजे. खात्री न झालेल्या पोस्ट इतर लोकांना पोस्ट करू नका तुमची जर खात्री नसेल तर कारण आपल्याला सगळ्या प्रकारची दक्षता गणेशोत्सव दरम्यान घ्यावी.

अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांसोबत पोलीसांचीही तयारी सुरू होते. शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आणि हे कार्यक्रम अडथळे विरहित, शांततेत पार पाडण्याची जबाबदारी पोलीसांच्या खांद्यावर असते. गणेशोत्सव हा सर्व धर्मांना एकत्र आणणारा उत्सव आहे. संपुर्ण महाराष्ट्राच्या उद्दात्त संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळे तयार झाली आणि गणेश मंडळांच्या माध्यमातून तरुणांमध्ये सांघिक वृत्ती तसेच प्रातिनिधीत्व करण्याची आवड निर्माण झाली. याद्वारे मंडळे समाजप्रबोधनात्मक उपक्रम तसेच कार्यक्रम राबवितात. याच मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोरया करंडकाची सुरूवात करण्यात आली. शहरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि त्यांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. ज्या मंडळांनी या स्पर्धेत सहभागी घेतला नव्हता किंवा ज्या मंडळांना पुरस्कार मिळाला नाही त्यांना यावर्षी आणखी प्रयत्न करून सहभागी होण्याची संधी आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मागील वर्षी १० दिवस शिस्तबद्ध उत्सव आणि उत्कृष्ट सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांसाठी प्रोत्साहनपर गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विहीत निकषांचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा परिमंडळ निहाय घेण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येक परिमंडळनिहाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या गणेश मंडळांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पोलीस आयुक्त स्तरावर प्रथम क्रमांक “शरयु प्रतिष्ठान”, निगडी प्राधिकरण यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक सिद्धीचा गणपती महिला मंडळ पाटीलनगर, बावधान आणि तृतीय क्रमांक श्री शिवशंभो प्रतिष्ठान, बारणेवस्ती, मोशी यांनी पटकावला.

परिमंडळ -१ स्तरावर पठारे लांडगे तालीम मित्र मंडळ, पठारे आळी, भोसरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय आझाद मित्र मंडळ, आझाद चौक, दापोडी यांनी द्वितीय आणि त्रिमुर्ती मित्र मंडळ, रामनगर, चिंचवड यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

परिमंडळ –२ स्तरावर कोकणे चौक मित्र मंडळ, रहाटणी पुणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर श्री बापदेव मित्र मंडळ ट्रस्ट, किवळे यांनी द्वितीय आणि अमर तरूण मंडळ, पुनावळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

परिमंडळ -३ स्तरावर साई मित्र मंडळ शाहूनगर, चिंचवड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर क्रांतिज्योत मित्र मंडळ, रुपीनगर यांनी द्वितीय आणि नवमहाराष्ट्र तरूण मंडळ, लांडेवाडी, भोसरी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

दरम्यान, यावेळी पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी मोरया पुरस्काराचे स्वरूप, विविध घटकांद्वारे मंडळांना देण्यात येणारे गुणांकन, पर्यवेक्षण प्रक्रिया तसेच पुरस्कार वितरण प्रक्रिया, गणेशोत्सवातील कार्यालयीन कार्यपद्धती आदींबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच सदरवेळी आयुक्त स्तरावरील प्रशिक्षक धनंजय मधुसूदन कुलकर्णी, सुभाष दगडु मालुसरे, अजित सुरेश वडगावकर, संदीप लक्ष्मीकांत पोलकम, रमेश पोपट ससार, यशराज  पारखी, संतोष दादा खवळे यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रणालीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी क्षेत्रीय कार्यालयनिहाय विसर्जन घाट, मुर्ती संकलन केंद्रे तसेच संकलनासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली वाहने याबद्दल संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित सामाजिक संस्थांच्या आणि गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या, प्रश्न, प्रतिक्रिया पोलीस आयुक्त तसेच महापालिका आयुक्त यांच्यासमोर मांडल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार पोलीस उप आयुक्त बापू बांगर यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button