ठेकेदाराला व्याजमाफी, मग मालमत्ताधारकांनाही दिलासा का नाही?
भाजपा नेते सचिन काळभोर यांची महापालिकेकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदाराला तब्बल १ कोटी ८३ लाख ११ हजार ९०४ रुपये इतकं व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलेला असताना, सर्वसामान्य नागरिकांवर मात्र मालमत्ता कराच्या विलंब दंडाचा आर्थिक बोजा लादला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांकडे मालमत्ताकरावरील विलंब दंड माफ करण्याची मागणी केली आहे.
काळभोर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, “रावेत येथील पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पासाठी मनाज इन्फ्रा कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला ४ कोटी ४१ लाखांचा अॅडव्हान्स देण्यात आला होता. प्रकल्प वेळेत न झाल्याने तो रद्द करण्यात आला आणि आता महापालिका ही रक्कम परत घेत आहे. मात्र, त्यावरील व्याज माफ करण्यात येत आहे. हे आर्थिक नुकसान असूनही ठेकेदाराला दिलासा दिला जातो, तर मग सामान्य नागरिकांना का नाही?”
त्यांनी सूचित केले की, मालमत्ता करात विलंब झाल्यास महापालिका चक्रवाढ दराने दंड आकारते, त्यामुळे अनेक नागरिक आर्थिक अडचणीत सापडतात. जर ठेकेदारासाठी महापालिकेचा दृष्टीकोन उदार असेल, तर शहरातील लाखो मालमत्ताधारकांसाठीही असा सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच मागणी आहे.
हेही वाचा – ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस
“जर महापालिका मालमत्ता करावरील दंड माफ केला, तर कर वसुलीत वाढ होईल आणि नागरिकांवरचा आर्थिक बोजा हलका होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शेवटी त्यांनी इशारा दिला की, महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास जनआंदोलन छेडले जाईल.





