कॉंग्रेस पक्ष महिलांना सक्षम, शक्तिशाली बनविणारा एकमेव पक्ष : सोनल पटेल
![कॉंग्रेस पक्ष महिलांना सक्षम, शक्तिशाली बनविणारा एकमेव पक्ष : सोनल पटेल](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-13-at-3.39.39-PM.jpeg)
- पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने ‘परिवर्तन २०२२’ शिबीराचे आयोजन
पिंपरी |
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधींबरोबरच कस्तुरबा गांधी यांचे देखील महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक आंदोलनात, सत्याग्रहात लाखो महिला देखिल अग्रेसर होत्या. स्वातंत्र्यानंतर राजकारणात महिलांचे प्रमाण कमी झाले. नंतर स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी महिलांसाठी प्रथम पंचायत राज्यामध्ये ३३ टक्के आरक्षण आणले होते. तत्कालीन स्व. पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात त्याला मंजूरी मिळाली. कॉंग्रेस पक्ष महिलांना जागृत, सक्षम आणि शक्तिशाली बनविणारा देशातील एकमेव पक्ष आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने रविवारी (दि. १३ फेब्रुवारी) आकुर्डी, प्राधिकरण येथिल केरळ भवन येथे आयोजित केलेल्या ‘परिवर्तन २०२२’ या महिला प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी सोनल पटेल बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, महिला शहराध्यक्षा सायली नढे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी नगरसेविका निर्मला कदम, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, छायाताई देसले, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, भारती घाग, सुप्रिया पोहारे, सोनू दमवाणी, राजश्री बनसोडे, राणी राठोड, रचना गायकवाड, सुप्रिया मलशेट्टी, प्रियांका कदम, दिपाली भालेकर,अनिता डोळस, वैशाली शिंदे, प्राजक्ता गावडे, अनिता अधिकारी, निर्मला खैरे तसेच मार्गदर्शक यशराज पारखी आणि ऋत्विक जोशी आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सोनल पटेल म्हणाल्या की, कॉंग्रेस पक्ष नेहमीच समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करणारा पक्ष आहे. स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी, स्व. पंतप्रधान राजीव गांधी, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दुरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयामुळेच देशातील खेडोपाड्यात, पंचायत समितीत त्याचबरोबर शहरी भागात देखील लाखो महिलांना राजकारणात नेतृत्व करण्याची संधी मिळत आहे. कॉंग्रेसनेच अठरा वर्ष पुर्ण झालेल्या युवक, युवतींना मतदानाचा अधिकार मिळवून दिला. युवक युवतींना राजकारणात योग्य संधी देण्याची भुमिका काँग्रेसच्या सरचिटणीस खा. प्रियांका गांधी तसेच खा. राहुल गांधी यांची आहे. स्थानिक निवडणूकांमध्ये महिलांना मिळालेल्या आरक्षणामुळे पन्नास टक्क्यांहून जास्त संधी मिळत आहे. अशा पध्दतीने स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत महिलांना समाजकार्यात आणि राजकारणात समान संधी मिळवून देणारा एकमेव पक्ष म्हणजे कॉंग्रेस पक्ष आहे असेही सोनल पटेल म्हणाल्या.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सरचिणीस खा. प्रियांका गांधी यांच्या आदेशाने ‘लडकी हू, लढ सकती हू’ या शिर्षकाखाली ‘परिवर्तन २०२२’ या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी काळात होणा-या मनपा निवडणूकीत जवळपास सत्तर जागांवर महिलांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्यात येणार आहे. त्याची पुर्व तयारी म्हणून या शिबाराचे आयोजन केले आहे. कॉंग्रेसच्या काळात स्थापन आणि विकसीत झालेल्या पिंपरी चिंचवड शहरात देशातील सर्व राज्यातील विविध जाती धर्मातील नागरिक रोजगारासाठी एकवटले आहे. मागील सात वर्षात देशात वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारीमुळे सर्व नागरिक त्रस्त आहेत. आता अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विचारांशी कोट्यावधी लोक जोडले जात आहेत. उत्तर प्रदेश, गोव्यासह इतरही राज्यात परिवर्तन होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत देखिल कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी कामाला लागले आहेत असे डॉ. कैलास कदम म्हणाले.
शिबीराच्या सुरुवातीला ज्येष्ठ उद्योगपती माजी खा. राहुल कुमार बजाज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वागत सायली नढे, सुत्रसंचालन सोनु दमवाणी, सुप्रिया पोहारे आणि आभार छायाताई देसले यांनी मानले.