दिवाळीपूर्वी स्थापत्य विभागाची कामे पूर्ण करा-महापौर उषा ढोरे
![Complete the work of architecture department before Diwali-Mayor Usha Dhore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/IMG_20211023_144041.jpg)
पिंपरी – आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आरोग्य व स्थापत्य विभागाने कामाचे एकत्रित नियोजन करुन दिवाळीपूर्वी अपूर्ण राहिलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी केल्या.
आयुक्त कार्यालयात स्थापत्य व आरोग्य विषयक विकास कामांबाबत महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, नगरसदस्य चंद्रकांत नखाते, नगरसदस्या अनुराधा गोरखे, माधवी राजापुरे, माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे, शहर अभियंता राजन पाटील, उप आयुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील तसेच सर्व प्रभागातील सहाय्यक आरोग्याधिकारी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या, विकासकामे करीत असताना रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्याकरीता सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील धुळीचा त्रास नागरिकांना होतो याकरीताही उपाययोजना करण्यात यावी. रस्त्याच्या कडेला असलेला कचरा व पालापाचोळा नियमित उचलला जात नाही. रस्त्याची साफसफाई करणा-या ठेकेदारांचे कामगार व त्यांना सोपविलेले काम याची तपासणी अधिका-यांनी बिल अदायगीपूर्वी करावी. सर्व प्रभागातील आरोग्य निरीक्षकांनी शहरात पाहणी करुन याबाबत संबंधित कर्मचा-यांना सूचना द्याव्यात. प्रभागातील कचरा उचलणा-या गाड्यांच्या फेरीत वाढ करण्याचे नियोजन करावे. दिवाळीपूर्वी सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत अशा सूचना महापौर ढोरे यांनी प्रशासनास दिल्या.
सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, रस्त्याचे डांबरीकरण होत असताना चेंबर्स विचारात घेतले जात नाही. त्यामुळे चेंबर्सच्या ठिकाणी खड्डा होतो. त्यामध्ये पाणी साचून वाहन चालवताना धोका उत्पन्न होतो. याकरीता स्थापत्य विभागाने नियोजन करुन चेंबर्सची उंची रस्त्याच्या सम पातळीत राहील याची दक्षता घ्यावी. ज्या ठेकेदारांनी अशा स्वरुपाचे चेंबर समपातळीत केलेले नसतील त्यांचाकडून ते त्वरीत करुन घ्यावेत व पुढील डांबरीकरण करतेवेळी दक्षता घ्यावी. अन्यथा स्थापत्य अथवा संबंधित विभागाने त्यावर दंडात्मक कारवाई करावी अशा सूचना बैठकीत नामदेव ढाके यांनी दिल्या तसेच आरोग्य विभागाने त्यांच्याकडील मनुष्यबळाचा वापर करुन शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नियोजन पूर्वक प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, आरोग्य विभागातील सतत गैरहजर राहणा-या कर्मचा-यांची माहिती संबंधित आरोग्य अधिका-यांनी प्रशासनाकडे सादर करावी असे सांगून त्यांनी मनुष्यबळ, यांत्रिक साधने, उपकरणे, सुस्थितीतील तसेच नादुरुस्त वाहने आदी आरोग्य विषयक कामकाजाचा सविस्तर आढावा सादर करावा अशा सूचना अधिका-यांना दिल्या.